अमेरिकेतील बाँड यील्डचा परिणाम : अदानींचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारात मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेतील बाँड यील्ड 16 वर्षानंतर उच्च स्तरावर पोहचल्याने भारतासह इतर जागतिक बाजारात विक्रीवर भर देण्यात आला होता. गुंतवणूकदारांचे सोमवारी 7.56 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
सलग चौथ्या सत्रात शेअरबाजार घसरणीत राहिला आहे. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 825 अंकांच्या घसरणीसह 64571.88 अंकांवर बंद झाला असून दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 260 अंकांनी घसरुन 19281.75 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी अदानी समूहातील 9 कंपन्यांचे समभाग कमकुवत दिसून आले.
अदानी पॉवरचा समभाग 6.36 टक्के घसरणीत होता. अदानी ग्रीनही 4.54 टक्के नुकसानीसह बंद झाला. तर एनडीटीव्ही, अंबुजा सिमेंट यांचे समभाग 4 टक्के, एसीसी सिमेंट, अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग 3 टक्क्यापेक्षा जास्त घसरणीत राहिले होते. मुथुट फायनान्स आणि बजाज फायनान्सचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले. पेटीएमचे समभाग दुसऱ्या तिमाहीतील निकालानंतर 5 टक्क्यापर्यंत घसरले होते.
अमेरिकेतील 10 वर्षाचे बाँड यील्ड वर्ष 2000 नंतर पहिल्यांदाच 5 टक्केपेक्षा जास्त दिसून आले. बँकांमध्ये एचडीएफसी, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक व एसबीआय यांचे समभाग कमकुवत दिसून आले. क्रेडिट अॅक्सिस ग्रामीण, बीएसई, इप्का लॅब, रेनबो चिल्ड्रन, मेड प्लस हेल्थ, युनायटेड ब्रेव्हरीज आणि बाळकृष्ण इंडस्ट्रिज यांचे समभाग मात्र बाजारात तेजी दाखवत होते. सेन्सेक्समध्ये 30 समभागांपैकी 2 वगळता इतर 28 समभाग घसरणीसह बंद झाले तर दुसरीकडे निफ्टी 50 मधील जवळपास 48 समभाग घसरणीसोबत बंद झाले होते.
सोमवारी मध्य आशियात वाढता तणाव हे कारणही गुंतवणूकदारांना प्रभावीत करताना दिसले. गुंतवणूकदारांनी याचदरम्यान सोमवारी 7.56 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. बीएसईचे बाजार भांडवल 311.33 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे. 10 वर्षाचा ट्रेझरी यील्ड 5 टक्केपेक्षा जास्त झाल्याने बाजारात चिंतेने घर केले. याने उधारी घेण्यासाठीचा खर्च वाढून आर्थिक विकासासाठी तो मारक ठरणार असल्याचेच बोलले जात आहे.
युरोपातील बाजारही मोठी घसरण अनुभवत होता. जागतिक बाजारात अमेरिकेतील डोव्ह जोन्स 193 अंकांनी तर नॅसडॅक 202 अंकांनी घसरणीत होता. आशियाई बाजारातही पडझडच दिसून आली. निक्की 259 अंकांनी, हँगसेंग 123, कोस्पी 17 आणि शांघाई कम्पोझीट 43 अंकांनी घसरणीत व्यवहार करत होता.









