एकावर कारवाई : 17 हजार 506 रुपयांचा मुद्देमाल जप्त : अनेकांचे धाबे दणाणले
बेळगाव : मोठ्या महानगरांपाठोपाठ आता बेळगावसारख्या लहान शहरामध्येही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला आहे. आरपीएफ जवानांनी बेळगाव रेल्वेस्थानकात एकावर कारवाई केली असून त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, तसेच रोख रक्कम जप्त केली आहे. अजून काही जणांकडून असा काळाबाजार सुरू असून त्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ज्या एक्स्प्रेसला प्रवाशांची मागणी अधिक असते, त्या एक्स्प्रेसची बुकिंग करून फुगवटा दाखविण्याचा प्रयत्न होतो. त्यानंतर ही तिकिटे काळ्याबाजारामध्ये दुप्पट किमतीला प्रवाशांना विक्री केली जातात.
काहीवेळा तर रेल्वेची वेबसाईट खुली होताच सर्व तिकीट फुल्ल असल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची अनेकवेळा गैरसोय होत आहे. गुरुवारी बेळगावमधील एका व्यक्तीला तिकिटांच्या काळ्या बाजाराप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन रेल्वे तिकिटांचे ई-तिकीट्स बुकिंग करताना त्याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. एकूण 17 हजार 506 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का? याची चौकशी केली जात आहे. यापूर्वीही बेळगावमध्ये तिकिटांचा काळाबाजार केला जात असल्याची चर्चा सुरू होती. परंतु कोणावर कारवाई झाली नव्हती. आता रेल्वे पोलिसांनीच कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.









