धोकादायक प्रकारामुळे सरकारलाही नुकसान : संबंधितांवर त्वरित कारवाईची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
व्यावसायिक सिलिंडरचा दर वाढल्यामुळे घरगुती सिलिंडरचा वापर वाढला आहे. काही ठिकाणी 14.2 किलो गृहोपयोगी सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्याचा प्रकार सुरू असून हे प्रकार धोकादायक आहेत. सरकारलाही अशा प्रकारांमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे, अशी माहिती ग्राहक जागृती कल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सोलंके यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, संघटितपणे घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचा धंदा सुरू आहे. या धंद्याला काही वितरक व सरकारी तेल कंपन्यांचा पाठिंबा आहे. अशांविरुद्ध सरकारने त्वरित कारवाई करावी. काळाबाजारात जादा पैसे मोजून घरगुती सिलिंडर खरेदी केले जाते. त्याचा वापर मात्र व्यावसायिक कारणासाठी होतो.
…तर कारागृहात पाठविण्याची कायद्यात तरतूद
देशभरात हा एक संघटित धंदा झाला आहे. जीव धोक्यात घालून गॅस रिफिलिंग केले जात आहे. वाहनांनाही गृहोपयोगी सिलिंडरमधून गॅस भरला जातो. पंपच्या साहाय्याने गॅस सिलिंडरमधून ट्यूबच्या माध्यमातून रिफिलिंगचा धंदा चालतो. मात्र, हा धंदाच धोकादायक असून रिफिलिंग करताना कोणत्याहीक्षणी स्फोट होण्याची शक्यताच असते. घरगुती वापराच्या सिलिंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर केल्यास संबंधितांना कारागृहात पाठवण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, कारवाई केली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. यासंबंधी 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केल्याचे नितीन सोलंके यांनी सांगितले.









