विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात तांदूळ जप्त : बहुतांशजण नवीन रेशनकार्डच्या प्रतीक्षत्
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यापासून रेशनकार्डधारकांना माणसी 10 किलोप्रमाणे तांदळाचे वितरण केले जात आहे. त्यामुळे बहुतांश जणांकडून बेकायदा तांदळाचा साठा केला जात असून आता पुन्हा अन्नभाग्य योजनेच्या तांदळाची काळ्याबाजारात विक्री होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या गॅरंटी योजनेपैकी एक असलेल्या अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रति माणसी दहा किलो तांदूळ देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र तांदळाचा पुरवठा होत नसल्याने 10 किलो ऐवजी 5 किलो तांदूळ दिला जात होता. तर उर्वरीत 5 किलो तांदळाचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जात होते. केंद्र सरकारने माफक दरात तांदूळ पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मार्चपासून रेशनकार्डधारकांना प्रति माणसी 10 किलो तांदूळ दिला जात आहे. म्हणजे एका कुटुंबात 5 जण असल्यास त्यांना 50 किलो तांदूळ मिळत आहे. साधारण एका कुटुंबाला 20 ते 25 किलो तांदूळ पुरेसा आहे. त्यामुळे अतिरिक्त तांदळाचा साठा काळ्या बाजारात विक्री करण्याचा धंदा पुन्हा एकदा सुरू झाला आहे.
तांदळाची खरेदी करणारे एजंट 10 ते 20 रुपये किलोप्रमाणे तांदळाची खरेदी करून तोच तांदूळ पुन्हा 40 ते 50 रुपये किलोप्रमाणे विक्री केला जात आहे. मार्च महिन्यात बेळगाव, गुलबर्गा, गदग, चामराजनगर, बळ्ळारी, हुबळी, उडुपीसह राज्यात हजारो क्विंटल बेकायदा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. गुलबर्ग्यात 515 क्विंटल, बळ्ळारी 251, गदग 119 आणि बिदरमध्ये 117 क्विंटल बेकायदा तांदूळ सापडला आहे. हे सर्वजण तांदळाचा साठा करून त्याची विक्री करताना अचानक छापे टाकून अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. साठा केलेला हाच तांदूळ नजीकच्या राज्यात विक्री केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे.
सध्या ओटीपी बंद असून केवळ रेशनकार्डधारकांना बायोमेट्रिक घेऊन तांदळाचे वितरण केले जात आहे. जे रेशनकार्डधारक स्वत: रेशन दुकानात उपस्थित राहून बोटाचे ठसे देत आहेत. केवळ त्यांनाच तांदूळ दिला जात आहे. मात्र माणसी 10 किलो तांदूळ मिळत असल्याने अतिरिक्त तांदळाची काळ्या बाजारात विक्री होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रति माणसी 10 किलो तांदूळ देण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. मात्र बहुतांश रेशनदुकानदारांनी फेब्रुवारी महिन्यात पाच किलोप्रमाणे तांदळाचे वितरण केले होते. काही रेशन दुकानदारांनी मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्यातील पाच किलो उर्वरित तांदूळ आणि मार्च महिन्यातील 10 किलो असा एकूण 15 किलो तांदूळ वितरित केला आहे.
बहुतांशजण बीपीएल कार्डाच्या प्रतीक्षेत
राज्यात बीपीएल रेशनकार्डधारकांना मार्च महिन्यापासून प्रति माणसी 10 किलोप्रमाणे तांदळाचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बीपीएल कार्डसाठी अर्ज केलेले 0.86 लाख अर्जकर्ते कार्डाच्या प्रतीक्षेत आहेत. तातडीने नवीन रेशनकार्डचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र सध्या नवीन रेशनकार्डासाठी अर्ज स्वीकारणार नसल्याचे आहार व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र यापूर्वी अर्ज केलेल्यांना तरी बीपीएल कार्डांचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.










