कोल्हापूर / सुधाकर काशीद :
सगळ्यात पहिल्यांदा हे, की काळी बाहुली, लिंबू, अंगारा, सुई, दाबणाने टोचलेला लिंबू.. अशा प्रकारात कसलीही ताकद नाही किंवा त्यामुळे कोणाचेही काही वाईट होत नाही. त्याच्या गुढमय वापरामुळे घाबरायचे तर कारणच नाही. पण हे अनेकांना पटत नाही आणि अनेकांच्या मनातला नेमका हाच नाजूक कोपरा हेरून घबराट पसरवण्याचा प्रकार पंचगंगा स्मशानभूमीत होत आहे. अग्नी दिलेल्या चितेच्या राखेवर कणकेची बाहुली, सुया टोचलेला लिंबू, काळी बाहुली अज्ञातांकडून ठेवण्याचा प्रकार स्मशानात होत आहे आणि निष्कारण भीतीचे वातावरण तयार केले जात आहे.
असला प्रकार म्हणजे मानसिक कमकुवतपणा असला तरीही अनेकांच्या मनात एका अनामक भीतीने घर केलेले असते आणि विशेषत: स्मशानाच्या जागी ते आणखी ताजे होते आणि त्याचाच फायदा घेत असे प्रकार करून देणाऱ्यांकडून घेतला जात आहे. आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या लोकांकडून पैसा उकळला जात आहे. बाहुली, लिंबू करून देणारे हेच असतात आणि त्यावर उपाय आहे, असे सांगून शांती करून देणारेही तेच असतात. किमान 1001 रुपयाला गंडा ते लोकांना घालत असतात.

पंचगंगा स्मशानभूमीला दोन गेट आहेत. अमावस्या, पौर्णिमेला या परिसरात हमखास असले फालतू प्रकार होतात. स्मशानाच्या जुन्या शिवाजी पूल कमानीजवळ तर परडी दहीभात, त्यावर गुलाल बुक्का, उदबत्त्या, काळी बाहुली याचा ढिग रात्री येऊन पडतो. वैयक्तिक पातळीवर असलेल्या चिंता–समस्यांवर हा उपाय कोणीतरी सांगितलेला असतो आणि मानसिक खचलेला कोणी ना कोणी तरी असला उपाय करायला तयार होत असतो. हा प्रकार रात्रीच्या वेळी होत असल्याने रात्री स्मशानभूमीचे दोन्ही गेट बंद केले जातात. तरीही स्मशानात असे भीतीदायक प्रकार करण्यासाठी अनेक जण स्मशानाबाहेर रात्री घुटमळत असतात. काही जण स्मशानाची भिंत व पत्रा यातून धूर बाहेर जाण्यासाठी असलेल्या मोकळ्dया फटीतून अशी बाहुली, लिंबू , नैवेद्य स्मशानात फेकून देऊन पोबारा करतात. रोज असे घडते आहे. स्मशानातील कर्मचारी असा प्रकार दिसला की ते काढून टाकतात. पण काही वेळा अशा बाहुल्या, लिंबू स्मशानात विखरून पडून राहतात. कारण रात्री बारानंतर अंत्यविधी खूपच कमी संख्येने होत असतात.
दरम्यान, स्मशानातले असे प्रकार म्हणजे भीती किंवा काही चमत्कार, हा प्रकार एक टक्काही नाही. त्यात अजिबात तथ्यांश नाही. निव्वळ अंधश्रद्धेचा हा प्रकार आहे. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे हाच त्यावरचा उपाय आहे. पण एवढे मात्र नक्की, की हा प्रकार काही जणांच्या दृष्टीने कमाईचा आहे. तेच असले प्रकार करायला लावत आहेत. आणि शांती करून द्यायलाही पैसे उकळत आहेत. हा निव्वळ पैसे मिळवण्याचा काही जणांचा धंदा आहे. कारण लिंबू, त्यात सुया, त्यावर काळी बाहुली अशा वस्तू स्मशानात पहायला मिळणे म्हणजेही निष्कारण भीती निर्माण करायला पुरेशी ठरते. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अगदी धाडसाने अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केले पाहिजे. नाही तर असे प्रकार वाढणारच आहेत आणि आपल्याला एक अनामिक भीती घालणाऱ्या बनावट तांत्रिक, मांत्रिकांचा धंदा मात्र तेजीत चालणार आहे.
स्मशानात 18 कर्मचारी आहेत. ते तीन शिफ्टमध्ये काम करतात. रजा–सुट्टी धरून पाच कर्मचारी कामावर असतात. त्यांना अशा बनावट तांत्रिक–मांत्रिकांचा अंदाज असतो. स्मशानाजवळ विनाकारण घुटमळणाऱ्याला ते थांबू देत नाहीत. रात्री ते दोन्ही गेट बंद करतात. विशेषत: अमावस्या, पौर्णिमा, ग्रहणाच्या वेळी व दर बुधवारी हा प्रकार जास्त घडतो. स्मशानातील कर्मचारी अशा प्रकाराला अजिबात घाबरत नाहीत. पण भिंत व पत्र्याच्या फटीतून लिंबू, काळ्या बाहुल्या फेकून काहीजण निघून जातात. काही जण स्मशानातील राख तांत्रिक–मांत्रिक विधीसाठी मागत असतात. पण कर्मचारी इतरांना या राखेस हातही लावू देत नाहीत.








