शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय : रिंगरोडलाही विरोध
प्रतिनिधी / बेळगाव
भाषावार प्रांतरचनेनंतर बेळगावसह संपूर्ण सीमाभाग म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. याचा निषेध आजही सीमावासियांकडून केला जातो. 1 नोव्हेंबर रोजी अन्यायाने म्हैसूर प्रांतात डांबण्यात आल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ सायकलफेरी काढून सीमावासीय प्रांतरचनेला विरोध दर्शवितो. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सायकलफेरी होऊ शकली नाही. परंतु यावषी 1 नोव्हेंबर रोजी भव्य सायकलफेरी काढली जाणार असून यामध्ये बेळगावसह सीमाभागातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होतील, असा निर्धार शहर म. ए. समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला.
रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे पार पडलेल्या बैठकीत काळादिन सायकल फेरी, रिंगरोड भू-संपादनाला विरोध तसेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. बेळगाव शहराच्या आसपासची सुपीक जमीन हडपण्याचा प्रयत्न या ना त्या मार्गाने सुरू आहे. गरज नसतानाही मोठमोठे प्रकल्प शेतकऱयांच्या माथी मारून जमीन बळकावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. हलगा-मच्छे बायपासनंतर आता रिंगरोडच्या माध्यमातून शेतकऱयांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली पुकारल्या गेलेल्या लढय़ाला शहर समिती पूर्णपणे बळ देईल, असा ठराव करण्यात आला.
1 नोव्हेंबर रोजी सायकल फेरीसाठी परवानगी मिळो ना मिळो, परंतु निषेधफेरी ही निघणारच. यावषी धर्मवीर संभाजी चौकापासून निषेधफेरी काढण्याचा निश्चय करण्यात आला असून मोठय़ा संख्येने सीमावासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात बेळगावमधील सुवर्णसौध येथे होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भव्य महामेळावा घेऊन अधिवेशनाला विरोध केला जाईल, असा निश्चय करण्यात आला.
यावेळी शहर म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातकांडे, मदन बामणे, अंकुश केसरकर, ऍड. अमर येळ्ळूरकर, श्रीकांत कदम, विश्वनाथ सूर्यवंशी, अमित देसाई, शिवानी पाटील, श्रीकांत मांडेकर, चंद्रकांत केंडुसकर, रणजित हावळण्णाचे, अभिजित मजुकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









