मूक मोर्चा- सायकल फेरीतही सीमावासियांचा लक्षणीय सहभाग
वार्ताहर /किणये
तालुक्यात बुधवारी 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित मूक मोर्चा व सायकल फेरीत तालुक्यात सीमावासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काही गावातील सीमाबांधवांनी बुधवारी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून हा काळा दिवस गांभीर्याने पाळला. बुधवारच्या मूक फेरीला आपला सहभाग दर्शवून महाराष्ट्रात जाण्याची तळमळ दाखवून देण्यात आली. 1956 साली भाषावार प्रांतरचना करताना केंद्र सरकारने मराठी बहुभाषिक भाग तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून सीमाभागात आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू करण्यात आले. दरवर्षी 1 नोव्हेंबर हा काळा दिवस सीमाबांधव गांभीर्याने पाळतात व मराठी भाषिकांवर जो अन्याय झाला आहे, त्याचा विरोध म्हणून मूक सायकल फेरी काढून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय, अत्याचार झालेला आहे. आपल्या मातृभाषेच्या राज्यात जाण्यासाठी सीमाबांधव धडपडतो आहे. गेल्या 67 वर्षापासून लोकशाही मार्गाने सीमाप्रश्नाचा लढा सुरू आहे. सीमाप्रश्नासाठी अनेक आंदोलने, मोर्चे झालेले आहेत. कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात काहीजण हुतात्मे झाले आहेत. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेकांनी लाठ्या खाल्ल्या आहेत, तुरुंगवास भोगला आहे. सीमाबांधवांना प्रशासन नेहमीच दुय्यम वागणूक देते. आपल्या मराठी भाषेसाठी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सीमाबांधवांचा लढा सुरू आहे. गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. 1 नोव्हेंबर काळा दिन बुधवारी स्वयंस्फूर्तिने सीमाबांधवांनी पाळला. सीमाप्रश्नाच्या लढ्यामध्ये आता चौथी पिढी सक्रिय झाली आहे. बुधवारी मूकफेरीला तालुक्यातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सीमाप्रश्नाचा लढा न्यायालयात आहे. न्यायदेवता सीमावासियांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास युवापिढीला आहे. मात्र तोपर्यंत रस्त्यावरची लढाई सुरू ठेवण्यासाठी तालुक्यातील सीमाबांधवांची एकजूट कायम राहणार आहे.
शेतकरीही लढ्यात सहभागी
विविध गावांमधील समितीच्या कार्यकर्त्यांनी आपापले व्यवसाय, दुकाने बंद ठेवून मूक फेरीमध्ये सहभाग दर्शविला तर शेतकऱ्यांनीही बुधवारी शेतावर न जाता आपल्या न्याय हक्काच्या लढ्यात सहभाग दर्शविला. बहुतांशी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये दुकाने बंद होती.









