शहापूर येथील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार
बेळगाव : बेळगावसह संपूर्ण सीमाभागावर झालेल्या अन्यायाविरोधात 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळला जातो. यावर्षी दिवाळी असली तरी मोठ्या संख्येने सीमावासीय काळ्यादिनाच्या फेरीत सहभागी होतील. तसेच हा लढा कर्नाटक राज्य सरकार विरोधात नसून केंद्र सरकार विरोधात असल्याने कोणीही राज्य सरकार विरोधात घोषणा देऊ नये, अशी सूचना म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आली. रविवारी आचार्य गल्ली, शहापूर येथील राम मंदिर येथे शहापूर विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वडगाव, शहापूर, जुने बेळगाव येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत 1 नोव्हेंबर रोजी अधिकाधिक मराठी भाषिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच युवा कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी जागृती करण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, प्रशांत भातकांडे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शंकर बाबली, राजेंद्र बिर्जे, सागर पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, रमेश चौगुले, पिंटू भातकांडे, चिन्मय हदगल, विवेक बाळेकुंद्री, श्रीकांत कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आकाशकंदील अथवा दिवे लावू नयेत
यावर्षी काळ्यादिनादिवशी दिवाळी व लक्ष्मी पूजन असल्याने मराठी भाषिकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी आकाशकंदील अथवा दिवे लावू नयेत. पाडव्या दिवशी आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.









