औरंगाबाद: औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा करण्यात विद्यमान महापालिकेला अपयश आल्यामुळे औरंगाबाद येथील नागरिकांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. या प्रकरणी औरंगाबाद महानगरपालिका आणि महाराष्ट्र विकास आघाडी अपयशी ठरली असल्यामुळे आज 23 मे रोजी भाजपच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा महापालिकेवर काढण्यात येणार असून त्याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली.
भाजप चे सरकार असताना आमदार अतुल सावे यांच्या प्रयत्नाने औरंगाबादसाठी ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. मात्र महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून हि योजना राबवताना ठरवून दिलेल्या नियम आणि अटी मध्ये बदल करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन जरी केले असले तरी किरकोळ कामाव्यतिरिक्त काहीही काम झालेले नाही. याचा सर्व सामान्य नागरिकांच्या वतीने निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कराड यांनी सांगितले.