मिरवणुकीत भव्य शक्तिप्रदर्शन : उपस्थित कार्यकर्त्यांकडून भाजपच्या विजयाच्या घोषणा
खानापूर : भाजप उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी शक्तिप्र्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तालुका भाजपचे पदाधिकारी, बेळगाव जिल्हा प्रभारी सुलक्षणा सावंत, धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, धनश्री सरदेसाई, राजेंद्र रायका, किरण यळ्ळूरकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानापुरातील रस्ते कार्यकर्त्यांनी गजबजून गेले होते. शिवस्मारक येथे प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोलमडली होती. प्रथम गणपती मंदिरात पूजन करण्यात आले. यानंतर आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला तसेच जांबोटी सर्कल येथील बसवेश्वर पुतळ्याला मालार्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर मिरवणूक चौराशी मंदिरात आली. चौराशी देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर टिपूसुलतान चौक, बाजारपेठ, रविवारपेठ येथून मिरवणूक बेंद्रे खुट, देसाई गल्ली, विठ्ठलदेव मंदिर येथून स्टेशनरोडमार्गे शिवस्मारक येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विठ्ठल हलगेकर यांनी हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी ढोल-ताशाचा गजर, झांजपथक, करडी मजल, धनगरी ढोलवाद्यांनी परिसर दणाणून गेला होता. भाजपच्या विजयाच्या घोषणा देण्यात येत होत्या. मिरवणुकीत तरुण कार्यकर्ते व महिलांचा लक्षणीय सहभाग होता. अर्ज दाखल झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, शशिकला जोल्ले, विठ्ठल हलगेकर यांची भाषणे झाले.
मिरवणुकीचे आकर्षण
पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून काढलेली मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधत होती. मिरवणुकीच्या अग्रभागी घोडाही होता. बैलगाडीत उमेदवार विठ्ठल हलगेकर, प्रभारी सुलक्षणा सावंत, मंत्री शशिकला जोल्ले, माजी आमदार अरविंद पाटील व इतर पदाधिकारी विराजमान झाले होते.
भाजपसाठी जमेची बाजू
माजी आमदार अरविंद पाटील यांनी उमेदवारी हुकल्यानंतर आपली नाराजी दूर सारत कार्यकर्त्यांसह विठ्ठल हलगेकर यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते. याचे प्रत्यंतर बुधवारच्या शक्तिप्रदर्शनात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने दिसून आले. अरविंद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग हा भाजपसाठी जमेची बाजू ठरणार आहे.









