राज्य उपाध्यक्ष अॅड. अनिल बेनके यांचा पुढाकार
बेळगाव : काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केल्याने भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला. ऑपरेशन सिंदूर यशस्वी होण्यासह भारतीय सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवारी भाजपचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. धर्मवीर संभाजी चौकातून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून माजी सैनिकांच्या हस्ते तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी सैनिकांनी भारतीय सेनेचे कौतुक करण्यासह पाकिस्तान व त्यांना मदत करणाऱ्या तुर्कीये व चीन देशांचा निषेध केला. पाकिस्तानला इतर अन्य देशांनी पाठिंबा दिलेला नाही. पाकिस्तानचे चार तुकडे होणार असल्याचे बलुचिस्तान सेनेने सांगितले आहे, असे यावेळी माजी सैनिकांनी सांगितले. हातात तिरंगा ध्वज घेऊन रॅलीतील नागरिक धर्मवीर संभाजी चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, मारुती गल्लीमार्गे जाऊन कांबळी खूट येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी माजी सैनिक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









