सत्तांतरानंतर महापालिका निवडणुकीत वाढले महत्त्व : केंद्रासोबत आता राज्यात येणार सत्ता : भाजपच्या गळाला लागणार तगडे उमेदवार
कोल्हापूर / विनोद सावंत
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर जिल्हय़ात भाजप रसातळाला गेली होती. एकही आमदार आणि कोणतेही सत्ता नसल्याने महापालिका निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडी वर्चस्व निर्माण करेल, असे चित्र होते. मात्र, सध्या राज्यातील राजकीय चित्र पाहता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर भाजपचे तगडे आव्हान राहणार आहे. नुकत्याच्य झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक विजयी झाले, आता राज्यातही भाजप सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाडिक गटासह भाजपला बळ मिळणार आहे. याचा परिणाम मनपा निवडणुकीत कितपत होणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात सत्तेवर असल्याने या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड होते. यात काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यामुळेच राज्य शासनासह जिल्हा नियोजन मंडळातून प्रभागात विकासकामांसाठी निधी मिळणार, या आशेने निवडणुकीमध्ये इच्छुकांचा महाविकास आघाडीकडे कल होता. ताराराणी आघाडीचे 6 माजी नगरसेवक या कारणामुळेच काँग्रेसच्या गळाला लागले होते.
गेल्या पाच वर्षात महाविकास आघाडीने शहरात कोटय़ावधींचा निधी आणला. या जोरावर महाविकास आघाडी महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरणार होती. त्यामुळेच 31 वॉर्डमधील तगडय़ा उमेदवारांचा कल महाविकास आघाडीकडे होता. त्यातूनच भाजप-ताराराणी आघाडीला 92 ठिकाणी तगडे उमेदवार शोधण्याची वेळ येईल, असेही म्हटले जात होते. राज्यात सत्तांतर झाल्याने हे चित्र आता बदलणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दहा वर्षातील सत्तेला खिंडार पाडण्याचा डाव
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने त्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेवर 10 वर्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीकडून जोमाने उतरण्यासाठी हालचाली सुरू आहेत. केंद्राबरोबर आता राज्यातही भाजफ सत्तेत येणार असल्याचा फायदा या निवडणुकीत घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे सुत्रे असणार आहेत.
इच्छुक झेंडे बदलणार?
राज्यात सत्तेत असणाऱया पक्षांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेहमीच पारडे जड असते. महापालिका याला अपवाद नाही. या निवडणुकीसाठी इच्छुकांचा कल महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठीच होता. त्यामुळेच कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत इच्छुकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले. आता राज्यातील चित्र बदलल्याने भविष्याचा विचार करून इच्छुक झेंडा बदलणार की जुन्या निर्णयावर ठाम राहणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
46 प्लससाठी ‘काँटे की टक्कर’
राज्यातील सत्तांतरानंतर महापालिका निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. गत निवडणुकीत भाजपचे 81 पैकी 33 नगरसेवक निवडून आले होते. मॅजिक फिगर गाठता न आल्याने त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. यंदाच्या निवडणुकीत 46 पेक्षा जास्त नगरसेवक ज्याचे निवडून येणार त्यांची सत्ता असणार आहे. भाजप-ताराराणी आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये 46 प्लससाठी काँटे की टक्कर होणार, यात शंका नाही.
शिंदे गटाच्या भुमिकेकडे नजरा
माजी आमदार राजेश क्षीरसागर सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे आहेत. मनपा निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे नजरा असणार आहेत. निवडणुकीमध्ये शिंदे गट, भाजप-ताराराणी आघाडीसोबत राहणार की स्वतंत्र लढणार याकडेही नजरा आहेत.
गत सभागृहातील पक्षीय बलाबल
काँग्रेस-राष्ट्रवादी- 44
भाजप-ताराराणी आघाडी-33
शिवसेना-4









