पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उदघाटन करण्याची आतुरतेने वाट बघत होते. येत्या सप्टेंबरमध्ये जी-20 देशांच्या प्रमुखांची जंगी बैठक इथे आयोजित करून आपण कसे विश्व नेता झालेले आहोत हे त्यांना देशाला दाखवायचे होते. पुढील महिन्यातील अमेरिका भेटीकडे देखील त्यांची आस लागली होती. अमेरिकन राष्ट्रपती जो बिडेन यांच्याशी काय विचारविनिमय करावयाचा याबाबत त्यांचा खल चालला होता. दहा महिन्यांवर लोकसभा निवडणूका आल्या असताना तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून पंडित नेहरूंशी त्यांना बरोबरी करावयाची होती. भारतात ‘अमृत काल‘ अवतरला आहे अशी अवधारणा बनवली जात होती. ‘एक मोदी सब पर भारी‘ असे सांगत विरोधकांना हिणवले जात होते.
असे सगळे मनसुबे बांधले जात असतानाच अचानक माशी शिंकली आहे. कर्नाटकमधील भाजपच्या जबर पराभवाने सत्ताधारी वर्तुळातील एकदम रयाच गेली आहे. ‘हे सारे झाले आहे तरी काय? ‘अशा झटक्याने पंतप्रधान तसेच गृह मंत्री अमित शहा दि.ग्मूढ झालेले आहेत. मोदींवर असीम श्रद्धा बाळगून ‘मोदी है तो मुमकिन है, गजर करणारी भक्त मंडळी देखील सध्या तरी गार पडलेली दिसत आहेत. कर्नाटकमधील एकूण 224 पैकी 30 मतदारसंघात भाजपची अनामत रक्कम जप्त झाली आहेत असे दावे होत आहेत. ते खरे असले तर पक्षापुढील संकट दिसते तितके सोपे नाही. भाजपच्या पराभवाला ये•ाrयुराप्पा यांनी विविध प्रकारे हातभार लावला अशी वृत्ते येत आहेत. याचा अर्थ मोदी-शहा यांची पक्षावरील पकड कमी होत चालली आहे असा होतो. चार राज्यातील निवडणूका येत्या सहा महिन्यात होत असताना ही अशी भावना चांगली नाही.
संकटे येऊ लागली कि मग त्यांची मालिकाच सुरु होते. जम्मू आणि काश्मीरमधील वाढता दहशतवाद चिंतेचा विषय आहे. दोन घटनांत पाच कंमाडोंसह दहा सैनीक धारातीर्थी पडले आहेत. पाकिस्तानमधील वाढती बेबंदशाही कोणते रूप घेईल याची चिंता वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानवरील चीनचा प्रभाव वाढू शकतो त्याने नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत. अफगाणिस्तान आणि मध्यपूर्वेतील चीनचे वाढते वजन ही एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. भारताचा एकेकाळचा जीवलग मित्र असलेला रशिया आर्थिक कारणांमुळे चीनच्या ताटाखालचे मांजर होऊ लागला आहे.
भाजपकरता एक जमेची बाजू अशी कि उत्तरप्रदेशमधील पक्षाचा किल्ला मजबूत आहे. तेथील झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने परत आपला जलवा दाखवलेला आहे. उत्तर प्रदेशात मात्र एक नवीच समस्या आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या राज्यात कोणाला फारसे फिरकून देत नाहीत. ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है ?‘ असेच त्यांना जणू सुचवायचे आहे. पक्षाच्या इतर मुख्यमंत्र्याप्रमाणे श्रेष्ठींना ते भाव देत नाहीत कारण स्वतालादेखील ते श्रेष्ठीच समजतात. शहा आणि त्यांच्यामध्ये एक शीतयुद्ध सुरु झाले आहे.
कर्नाटकच्या पराभवात अमित शहा तसेच भाजप सरचिटणीस बी एल संतोष यांचा मोठा वाटा आहे अशी कुजबुज सुरु झाली आहे. भाजप अध्यक्ष जे पी न•ा यांना कोणी फारसे थोर मानतच नसल्याने त्यांना अनुल्लेखाने मारले जाते. सहा महिन्यांपूर्वी न•ा यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता गेली तेव्हा त्यांनी राजीनामा देण्याचे साधे नाटक देखील केले नव्हते. कर्नाटकचे वादळी वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कर्नाटकचे वादळ भाजपला अबाधित राखू शकत नाही. मोदी-शहा कमजोर झाले आहेत असे दिसणे पक्षाला घातक आहे. त्यांनी पूर्वीसारखी मनमानी चालू ठेवली तर नवीन ठयेडियुरप्पा‘ निर्माण होऊ शकतात. पक्षाचे बारा वाजवण्यासाठी बंड करण्याच्या ऐवजी आत राहून देखील काम करता येते. स्वत?चा ‘चाणक्य‘ म्हणून नेहेमी गौरव करून घेण्रायांपुढे कसोटीची घडी आहे. श्रेष्ठी अडचणीत असतात तेव्हा पक्षातील असंतुष्ट आणि महत्वाकांक्षी मंडळी उचल खातात हा इतिहास आहे. पक्ष कोणताही असो. राष्ट्रवादी अथवा भाजप. म्हातारी मेल्याचे दु?ख नाही पण काळ सोकावतो या न्यायाने बघितले तर कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या रखडलेल्या ऐक्य योजनेला गती मिळू लागली आहे. काँग्रेसला टाळून विरोधी पक्षांची मोट बांधली जाऊ शकत नाही याची प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कबुली ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यासारखे नेते देऊ लागले आहेत. नितीश कुमार यांना नवीन हुरूप आलेला आहे. कर्नाटकात सिद्धरामैया आणि शिव कुमार यांनी आपले हेवेदावे बाजूला सारून निवडणुकीत जे ऐक्याचे दर्शन घडवले त्याचे उदाहरण राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांनी पाळले तर केंद्रात भाजपाला आडवे करायला वेळ लागणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
वादग्रस्त किरेन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरून हटवून पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाला खुश करण्याचे काम केलेले आहे. सीबीआय च्या प्रमुखपदाच्या नेमणुकीत मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सरकारची साथ दिल्यानंतर रिजिजू यांना नारळ दिला गेला. या नेमणूक समितीवर असलेले तिसरे सदस्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी कर्नाटकचे पोलीस प्रमुख प्रवीण सूद यांच्या नावाला विरोध केला होता. सूद यांचे नाव आयत्यावेळी आणले गेले असा त्यांचा आरोप होता भाजपचे मित्रपक्ष देखील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेसच्या कर्नाटक विजयाची मुहूर्तमेढ रोवली असे सांगत राज्यकर्त्यांना अस्वस्थ करत आहेत. ‘मोदींनी राहुलना घरातून बाहेर काढले तर राहुलनी भाजपला कर्नाटकाच्या सत्तेतून खाली खेचले‘ असे विरोधक खोचकपणे म्हणत आहेत. 2014च्या लोक सभा निवडणुकीपूर्वी ठअसिसिडेंटल प्राइम मिनिस्टरठ हे मनमोहन सिंग यांच्या विरोधात पुस्तक लिहिणारे त्यांचे एकेकाळचे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. ‘कर्नाटक मध्ये मोदी विरुद्ध राहुल अशी सरळ लढाई होती त्यात मोदी हारले ‘, असे स्पष्टपणे सांगून त्यांनी पंतप्रधानांचा जाहीर पाणउताराच केलेला आहे. मोदींविरोधात एवढे स्पष्ट विचार ऐकायची सवय नसलेल्या भाजपाईंना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
पंतप्रधानांच्या अगोदर राहुल गांधी यांची होत असलेली अमेरिका भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची आहे. तेथील एका प्रथितयश विश्वविद्यालयात ते भाषण देणार असून त्यांची एक पत्रकार परिषद देखील होणार आहे. विदेशात जाऊन मोदींनी कधीकाळी आपली प्रतिमा वाढवली. राहुल यांच्या या भेटीनंतर पंतप्रधान तिकडे जाणार असल्याने त्यासुमारास भारतातील राजकीय वातावरण तापणार आहे.
आता 2000 रुपयाच्या नोटा या चलनातून हटवण्याचा निर्णय घेऊन पंतप्रधानांनी एक नवीन धमाका उडवून दिलेला आहे. यावर राजकारण सुरु झाले नसते तरच नवल होते. विरोधी पक्षांना साहजिकच ही कृती म्हणजे ‘नोट बंदी-भाग दोन‘ वाटत आहे. ठपहिल्यादा ते म्हणत होते कि 2000 रुपयाच्या नोतेमुळे भ्रष्टाचार काबूत येईल आणि आता म्हणत आहेत कि ही नोट बंद केली कि भ्रष्टाचार बंद होईलठ, अशा प्रकारे विरोधकांकडून पंतप्रधानांना शालजोडीतील देणे सुरु झाले आहे. येत्या काळात वाढत्या उन्हाबरोबर राजकारण देखील तापणार आहे.
सुनील गाताडे








