निकाल काहीही लागो, नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक ही भाजपचा दम काढणारी ठरली. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याची शेखी मिरवणारा भाजप या निवडणुकीने अतिशय बेजार झाला. भीक नको पण कुत्रे आवर, असाच काहीसा प्रकार झाला. भाजप अचानक पंक्चर होणार की कसे ते उद्या कळणार आहे. पण शनिवारीच आपल्या घटक पक्षांची बैठक बोलावून विरोधकांच्या इंडिया आघाडीने आपण कोणत्याच बाबतीत पिछाडीवर नाही असाच संदेश दिलेला आहे.
भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान देऊ करून मोदी आणि अमित शाह वेगळीच खेळी खेळू शकतात अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक देखील अशा सरकारला पाठिंबा देऊ शकतात असे बोलले जात आहे. या साऱ्या चर्चेचे तात्पर्य असे की अचानक लोकांचा मूड बदलल्याने भाजप ही निकालापूर्वीच हादरली आहे. प्रत्यक्षात काय होणार ते उद्या दिसणारच आहे.
भाजपमधील एक गट मात्र एकप्रकारे बिनधास्त राहिलेला आहे. ‘आयेगा तो मोदी ही’ अशी त्याला खात्री आहे. ती कशामुळे आणि कसे हा तपशिलाचा भाग झाला. पण थोडक्यात सांगायचे झाले तर देशातील हिंदुत्वाचा ज्वर अजिबात ओसरलेला नसून तो केवळ विरोधकांना दिसत नाही. त्यामुळे भाजपचे चांगभले झाल्याशिवाय राहणार नाही असा त्याचा तर्क आहे. पण प्रत्यक्षात चित्र गुंतागुंतीचे आहे. भाजपचा गड असलेल्या उत्तर प्रदेशात विरोधकांनी अचानक कडवे आव्हान दिल्याने सत्ताधारी गडबडले असून त्याने त्यांचे निवडणुकीचे गणितही गडगडले आहे. 80 खासदार लोकसभेत पाठवणाऱ्या उत्तर प्रदेशात जर विरोधी पक्ष 40 जागांवर विजयी झाले तर भाजप कोणत्याही परिस्थितीत केंद्रात सरकार बनवू शकणार नाही असे मानले जात आहे. भाजपने बहुतांशी विद्यमान खासदारांना परत तिकीट दिल्याने लोकप्रतिनिधींच्या विरोधात लोकभावना प्रबळ झाल्याने त्याचा फटका भाजपला बसेल असे सांगितले जाते.
जय श्रीरामचा नारा आपल्याला सत्ता मिळवून देण्यात पुरेसा आहे, ही मोदींची अटकळ फोल ठरताना दिसत आहे. अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केल्याने तिसरी टर्म चातकाप्रमाणे आपली वाट पाहत आहे अशी स्वत:चीच समजूत करून घेणाऱ्या पंतप्रधानांना धक्क्यावर धक्के सहन करावे लागले. विस्कळीत असलेली विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे बिनबुडाचा फुगा अशी त्यांची धारणा घातक ठरली. विरोधकांना नेता निवडता येत नाही ते देशाला पंतप्रधान कसा काय देणार? त्यांच्यासमोर मोदी यांच्यासारखा लोकोत्तर नेता आहे. तेंव्हा ही आवळ्या-भोपळ्याची मोट म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेण्याचा प्रकार समजला गेला. गेल्या दहा वर्षात विरोधी पक्षांची जेवढी टर्र उडवली गेली ती यापूर्वी कधीही उडवली गेली नव्हती.
जर इंडिया आघाडीला चांगले दिवस आले तर त्याचे सारे श्रेय हे मोदींना देणे भाग पडेल. मोदींनी एकाचवेळी काँग्रेस तसेच प्रादेशिक पक्षांना अंगावर घेतले. आणि खवळलेल्या विरोधकांनी त्यांना शिंगावर घेतले असा त्याचा अर्थ होईल. या निवडणुकीत सर्वात एकसंघ आणि वरचढ पक्ष भाजपच होता पण निवडणुकीचे लांबलचक सात टप्पे पार पाडता पाडता सत्ताधाऱ्यांचीच जास्त दमछाक झालेली दिसली. स्वातंत्र्योत्तर भारतातील ही सर्वात जास्त वाद-विवाद आणि आरोप प्रत्यारोप यांनी गाजलेली निवडणूक ठरली ही गोष्ट निवडणूक आयोगाला निश्चितच भूषणावह नाही. विरोधी पक्षांनी 117 तक्रारी दाखल करूनदेखील भाजप अथवा पंतप्रधानांच्या विरुद्ध आयोगाने एक प्रकारे ब्र देखील काढला नाही हे या निवडणुकीचे वैशिष्ट्या ठरले आहे. आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रबळ असणाऱ्या भाजपने सत्तेचा वापर करत विरोधकांची विविध तऱ्हेने आर्थिक नाकेबंदी करून या सामन्यात लेव्हल प्लेयिंग फील्ड ठेवलेच नाही हे देखील तितकेच खरे आहे.
निवडणूक निकालाविषयी विरोधकांच्या एका गोटात देखील संभ्रमाचे वातावरण आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात परत जाण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हुकुमशाही विरोधात तीव्र हल्ला केला असला तरी
निवडणूक निकालांविषयी ते पत्रकार परिषदेत साशंक वाटले.
नरेंद्र मोदींनी देशात धुवाँधार प्रचार करून 220 अशा विक्रमी प्रचारसभेत भाषणे दिली आणि त्याचबरोबर त्यांनी 80 मुलाखती दिल्या. आत्तापर्यंतच्या झालेल्या निवडणुकात सत्ताधारी पक्षाच्या स्टार प्रचारकाने एवढी मोठी मोहीम कधीच चालवली नव्हती. ‘सब कुछ मोदी’ असे दाखविणे याचा एकमेव अर्थ म्हणजे एक म्हणजे ‘एक मोदी सब पे भारी’ असा निघतो. तो मोदी यांनी दाखवला.
या प्रचारात काय दिसले तर पंतप्रधानांनी केवळ आणि केवळ ध्रुवीकरणाचा मार्ग चोखाळून भाजपची हिंदुत्व मतपेढी घट्ट करणे आणि हाच त्यांचा उद्देश होता. तो किती साध्य झाला हे मंगळवारी दिसूनच येईल पण यातून अमृत निघायच्या ऐवजी बरेच विषदेखील बाहेर आले हे देखील तेवढेच खरे आहे. नुकतीच संपलेली निवडणूक म्हणजे मोदींकरता आत्तापर्यंतची सर्वात कठीण निवडणूक मानली गेली. ज्या राम मंदिराच्या जोरावर ही निवडणूक अतिशय सहजपणे जिंकू पाहत होते तो मुद्दाच या निवडणुकीत राहिला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची पंचायत झाली. विरोधकांच्या इंडिया आघाडीत काहीच अर्थ नाही आणि ते म्हणजे एक हेडलेस वंडर आहे असे मानणे देखील भाजपच्या अंगलट आले असे प्रचार मोहिमेत दिसून आले. काल-परवापर्यंत ज्या विरोधकांना दाबून ठेवून आणि त्यांच्याविरुद्ध तपास संस्था वापरून त्यांना सळो की पळो करण्याचे भाजपचे धोरण हे देखील या परिस्थितीला कारणीभूत आहे असे दिसून आले. ‘कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे, मी शूर शिपाई आहे’ ही भाजपची बढाई फसवी ठरली. बरोबरच राहुल गांधी यांनी आपल्या नेतृत्वाला आणलेली झळाळी भाजपाच्या आणि विशेषत: मोदी शहा यांच्या लक्षात आली नाही असेही दिसून आले. राहुल यांच्यात झालेला क्रांतिकारी बदल म्हणजे भाजपच्या हिंदुत्वाला शह देणारी एक वेगळी रणनीती होय. गांधी यांनी गरीब आणि गरीब शेतकरी कामकरी यांच्याकरता न्यायाची भूमिका घेऊन आणि तिचा सर्व प्रकारे जोरदार प्रचार प्रसार करून तळागाळात आपली हवा कधी आणि कशी निर्माण केली हे सत्ताधाऱ्यांना कळले नाही, असेही दिसले. ही हवा कितपत प्रभावी होती अथवा कसे हे प्रत्यक्ष निकालामधून दिसून येईलच परंतु पहिल्या फेरीतील मतदानानंतरच पंतप्रधानांना ध्रुवीकरणाचा मार्ग जोरदारपणे स्वीकारावा लागला यात विरोधकांचे कौशल्य दिसले. भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्व परीने साम दाम दंड भेद असे प्रकार उपयोगाला आणले. यातूनच मोदी शहा यांचे कार्ड झाले आहे, असे दिसले.
लोकसभा निवडणुकीत काय होणार याचे वेगवेगळे अंदाज राजकीय पंडित, एक्झिट पोल विश्लेषक तसेच ज्योतिषी मंडळी मांडत आहेत. अशात कोणाचे अंदाज खरे, कोणाचे खोटे हे येत्या उद्या प्रत्यक्षात दिसून येणार. ही निवडणूक मोदी भोवतीच फिरली पण या वेळेला पंतप्रधान हे अतिशय वादात अडकलेले दिसले. 2014 आणि 2019 मधील मोदी या निवडणुकीत गायब होते. कारण त्यांची रणनीती या निवडणुकीत चालली नाही असेच काहीसे दिसून आले. भाजपने विकसित भारताची गोष्ट केली खरी पण त्याबाबत कोणतेच प्रारूप मोदी अथवा इतर कोणी नेत्याने दाखवले नाही. विरोधी पक्षांनी महागाई, गरिबी, बेरोजगारी, वाढती विषमता असे एकाहून एक ज्वलंत मुद्दे मांडले. त्याला सत्ताधाऱ्यांकडे कोणतेच उत्तर नव्हते. कोणताही सत्ताधारी अशा प्रश्नांपासून स्वत:ला दूरच ठेवतो. या निवडणुकीचे वैशिष्ट्या असे की गेल्या दहा वर्षात प्रथमच गैर भाजप पक्ष यांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीचा केलेला प्रयोग होय. या आघाडीमुळे देशातील राजकारण पुढील काळात फार मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
भाजपला बहुमत मिळाले नाही पण तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला तर त्याला परत सत्ता स्थापनेसाठी बोलावले गेले तर आश्चर्य वाटायला नको. 1996 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 160 च्या आसपास जागा मिळाल्या होत्या पण तो सर्वात मोठा विरोधी पक्ष उदयाला आल्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी वाजपेयी यांची नेमणूक पंतप्रधान म्हणून केली होती. वाजपेयी हे सरकार स्थापण्याचा दावा पेश करण्यासाठी राष्ट्रपतींना भेटले असता शर्मा यांनी त्यांना पंतप्रधानपदाच्या निवडीचे पत्रच हाती दिले. केंद्रात त्यावेळी भाजप पहिल्यांदा सत्तेत आले होते. त्या वेळचे भाजपचे सरकार मात्र औटघटकेचे ठरले होते. तेरा दिवसात त्याचे तीन तेरा वाजले होते.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत नेतृत्व करण्याकरता दावेदारी सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जर आघाडीला बहुमत मिळाले तर राहुल गांधीच हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे घोषित केले आहे. ममता दीदींनी खर्गे यांचे नाव पंतप्रधान पदाकरता पुरस्कृत केले होते. त्याला जबाब म्हणून खर्गे यांनी राहुल यांची उमेदवारी पुढे केली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते जयराम रमेश यांनी आघाडीत या पक्षाला जास्त जागा मिळतील त्याचाच प्रतिनिधी हा पंतप्रधान व्हावा अशा तत्त्वाचा पुरस्कार केलेला आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी गट हे आपल्या सोंगट्या फिट करायला लागले आहेत.
सुनील गाताडे








