दोन्ही पालिकांसाठी शुक्रवारी झाले होते मतदान : फोंड्यात भाजप 10, रायझिंग फोंडा 4 तर 1 अपक्ष विजयी,सांखळीत भाजप 11 अपक्ष 1
फोंडा तसेच सांखळी नगरपालिकेसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची गणती काल रविवारी सकाळी सुरु झाली आणि दुपारपर्यंत लागलेल्या निकालांमुळे दोन्ही ठिकाणचे सारे वातावरण भाजपमय होऊन गेले. दोन्ही ठिकाणी भाजपने निर्विवाद बहुमत मिळविले. सांखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तर फोंड्यात कृषीमंत्री रवी नाईक यांचा दबदबा स्पष्ट झाला. फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीत 15 पैकी 10 जागा जिंकत भाजपाने बहुमताचा आकडा पार केला. प्रतिस्पर्धी ‘रायझिंग फोंडा पॅनल’लने चार तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. काँग्रेसने सहा प्रभागांमध्ये समर्थक उमेदवारांना पाठींबा दिला होता, पण त्या सर्वांचा धुव्वा उडाला. फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय हे विजयी झाले आहेत. या मोठ्या विजयानंतर फोंड्याच्या मतदारांनी विकासाच्या बाजूने मतदान केल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केली. दुसऱ्या बाजूने संपूर्ण गोव्यात अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी पालिका निवडणुकीचा निकाल फारच धक्कादायक ठरला. गेली दहा वर्षे या नगरपालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या ‘टुगेदर फॉर सांखळी’ या धर्मेश सगलानी यांच्या गटाचा अक्षरश: धुव्वा उडाला. दुसऱ्या बाजूने गेली दहा वर्षे नगरपालिकेवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना यावेळी पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात यश आले. या यशामुळे आता मुख्यमंत्र्यांची सांखळी पूर्णत: भाजमय झालेली आहे.
मुख्यमंत्र्यांची सांखळी पूर्णत: भाजपमय
‘टुगेदर फॉर सांखळी’ गटाचा धुव्वा : भाजपने मिळविले निर्विवाद बहुमत,रश्मी देसाई ठरल्या ठजायंट किलर

डिचोली, साखळी : संपूर्ण गोव्यात अत्यंत प्रतिष्ठेची बनेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी मतदारसंघातील सांखळी पालिकेच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक ठरला आहे. गेली दहा वर्षे या नगरपालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या ‘टुगेदर फॉर सांखळी’ या धर्मेश सगलानी यांच्या गटाचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. दुसऱ्या बाजूने गेली दहा वर्षे नगरपालिकेवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना यावेळी पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात यश आले आहे. या यशामुळे आता मुख्यमंत्र्यांची सांखळी पूर्णत: भाजमय झालेली आहे. निवडणुकीनंतर निकालाबद्दल सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागली होती. तसेच या निकालाचा उत्साहही तेवढाच मोठा होता. भाजप गटात भरलेला उत्साह पाहता या गटातील दहाही उमेदवारांनी मतदारांच्या भरघोस पाठिंबावर अधिराज्य प्राप्त केले. प्रचारात व एकंदरीत निवडणुकीच्या नियोजनात काही प्रमाणात मागेच राहिलेल्या ‘टुगेदर फॉर सांखळी’ या पॅनलच्या रिंगणात उतरलेल्या दहाही उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. प्रभाग क्र. 1 मधून नगरसेवक यशवंत माडकर यांनी स्वत:च्या प्रभागामध्ये पुन्हा आगमन केले. या प्रभागात त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या नगरसेविका कुंदा माडकर यांचा त्यांनी पराभव केला. कुंदा माडकर या निकालानंतर तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याचे दिसून आले. संतोष हरवळकर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. प्रभाग 2 या महिलांसाठी आरक्षित प्रभागात भाजपतर्फे रिंगणात उतरविण्यात आलेल्या निकिता नाईक यांनी बाजी मारली, तर माजी नगरसेवक धर्मेश सगलानी यांच्या पत्नी इशा सगलानी यांना पराभव स्विकारावा लागला.
सगलानी, वेरेकर यांचा पराभव
या नगरपालिकेत सर्वात महत्त्वाची व अटीतटीची लढत मानल्या जाणाऱ्या प्रभाग 3 मध्ये सिद्धी प्रभू यांनी माजी नगराध्यक्ष सुनीता वेरेकर यांचा पराभव केला. ही लढत थेट होती. अत्यंत लक्षवेधी असलेल्या प्रभाग 4 च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. या प्रभागामध्ये धर्मेश सगलानी आणि रश्मी देसाई यांच्यात थेट लढत होती. अत्यंत अटीतटीची व चुरशीची होणार असा अंदाज होता. लढतही त्याचप्रमाणे झाली, केवळ 28 मतांच्या आघाडीने रश्मी देसाई यांनी धर्मेश सगलानी यांचा पराभव करीत त्या विजयी ठरल्या.
राया पार्सेकरांच्या मातोश्री विजयी
प्रभाग क्र. 6 मध्ये माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांच्या मातोश्री विनंती विनायक पार्सेकर यांना टुगेदर फॉर सांखळीच्या डॉ. सरोज देसाई यांनी आव्हान दिले होते. या आव्हानाला राया पार्सेकर यांनी चोख उत्तर देत सुमारे 200 च्या वर मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. प्रभाग 7 मध्ये भाजपचे ब्रह्मानंद देसाई यांनी केवळ 15 मतांच्या आघाडीवर विजय मिळवला. तर राजेंद्र पोसनाईक दुसऱ्या व टुगेदर फॉर साखळीचे संपतराव देसाई हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. प्रभाग 9 मध्ये माजी नगरसेवक आनंद काणेकर यांनी आपला धबधबा कायम राखला. या प्रभागामध्ये उतरलेल्या एक युवा उमेदवार टुगेदर फॉर साखळीच्या भाग्यश्री ब्लेगन यांचा त्यांनी पराभव केला.
आनंद बोर्येकर यांची हॅट्ट्रिक
प्रभाग क्र. 10 मध्ये दयानंद बोर्येकर यांनी हॅट्रिक साध्य केली. सलग तीन वेळा जिंकून येत त्यांनी माजी नगरसेवक राजेंद्र आमेशकर यांचा पराभव केला. या प्रभागातही थेट लढत होती. प्रभाग 11 हा महिला ओबीसीसाठी राखीव होता. या प्रभागात भाजपतर्फे उतरलेल्या युवा महिला उमेदवार दीपा जल्मी यांनी टुगेदर फॉर साखळीच्या रश्मी घाडी यांचा पराभव केला. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 12 मध्ये भाजपच्या अंजना अर्जुन कामत यांनी टुगेदर फॉर सांखळीच्या आश्विनी कामत यांच्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत विजय संपादन केला.
फोंडा पालिकेवर भाजपाचा डंका
भाजपाचे 15 पैकी 10 उमेदवार विजयी : मगोपच्या पॅनेलने जिंकल्या 4 जागा,काँग्रेस समर्थक सर्व उमेदवारांचा धुव्वा,मंत्री रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र विजयी

फोंडा : फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीत 15 पैकी 10 जागा जिंकत भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. प्रतिस्पर्धी मगो रायझिंग फोंडा पॅनेलने चार तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. काँग्रेसने सहा प्रभागांमध्ये समर्थक उमेदवारांना पाठींबा दिला होता. त्यांना एकही जागेवर खाते उघडता आले नाही. फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश नाईक व रॉय नाईक हे विजयी झाले आहेत. या मोठ्या विजयानंतर फोंड्याच्या मतदारांनी विकासाच्या बाजूने मतदान केल्याची प्रतिक्रिया आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केली. प्रभाग 15 मध्ये भाजपा उमेदवार संपदा किशोर नाईक व मगो उमेदवार गीताली तळावलीकर यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे काढलेल्या निकालात गीताली यांनी बाजी मारली. प्रभाग 10 मध्ये भाजपाच्या उमेदवार दीपा शांताराम कोलवेकर या केवळ एका मताने तर प्रभाग 3 मध्ये झालेल्या अशाच अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या ज्योती अरुण नाईक यांचा अवघ्या 3 मतांनी विजय झाला.
दोन जागा बिनविरोध जिंकून विजयाची नांदी
फोंडा नगरपालिकेच्या 15 प्रभागांपैकी 13 प्रभागांमध्ये शुक्रवारी मतदान झाले व रविवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. खडपाबांध प्रभाग 7 मधून विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी व प्रभाग 13 मधून विद्या पुनाळेकर या दोन उमेदवारांना बिनविरोध निवडून आणत मतदानापूर्वीच भाजपाने मोठ्या विजयाची नांदी केली होती. अपेक्षेप्रमाणे त्याचा उत्तरार्ध 15 पैकी 10 जागा जिंकून पूर्ण करण्यात आला. तिस्क-फोंडा येथील सरकारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रविवारी सकाळी 8 वा. पासून मतमोजणीला सुरुवात झाली व दुपारी 12 पर्यंत सर्व प्रभागांचे निकाल जाहीर झाले.
नगराध्यक्ष रितेश नाईक प्रभाग 5 मधून विजयी
शांतीनगर प्रभाग 1 मध्ये मंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक व मगो रायझिंग फोंडा पॅनलचे नंदकुमार डांगी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत रॉय नाईक यांनी 32 मतांनी बाजी मारली. या प्रभागातून एकूण 5 उमेदवार रिंगणात होते. प्रभाग 2 मध्ये भाजपा उमेदवार नगरसेवक विरेंद्र ढवळीकर व मगो पॅनलचे राजेश तळावलीकर यांच्यात झालेल्या थेट लढतीत ढवळीकर यांनी 219 मतांची आघाडी घेऊन विजय नोंदविला. प्रभाग 5 मधून नगराध्यक्ष रितेश नाईक हे विजयी झाले असून त्यांनी अपक्ष उमेदवार श्रवण सत्यवान नाईक यांचा 206 मतांनी पराभव केला. येथील तिरंगी लढतीत मगो पॅनलच्या सुशांत कवळेकर यांना 180 मते मिळाली. दुर्गाभाट प्रभाग 10 मध्ये माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शांताराम कोलवेकर यांच्या पत्नी दीपा कोलवेकर व मगो पॅनलच्या उमेदवार मनस्वी परेश मामलेकर यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत दीपा कोलवेकर या केवळ एका मताने विजयी झाल्या. प्रभाग 15 मध्ये अशाचप्रकारे झालेल्या अटीतटीच्या लढतीत मगो उमेदवार तथा नगरसेविका गीताली तळावलीकर व भाजपा पॅनलच्या कु. संपदा किशोर नाईक यांना समान 402 मते मिळाली. दोनवेळा फेरमतमोजणी करुनही त्यात बदल न झाल्याने अखेर चिठ्ठी काढून लावलेल्या निकालात गीताली तळावलीकर या नशीबवान ठरल्या.
प्रतिक्षा नाईक सर्वांत तऊण विजयी उमेदवार
वारखंडे प्रभाग 8 मधून विजयी झालेली माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांची मुलगी अॅड. प्रतिक्षा नाईक ही फोंडा पालिकेवर निवडून आलेली सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक व्यंकटेश उर्फ दादा नाईक हे प्रभाग 4 मधून सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. सध्याच्या कार्यकाळातील सहा नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत तर विजयी उमेदवारांमध्ये एकूण 7 नवीन चेहरे आहेत.
मगो पॅनलचे 4 उमेदवार विजयी
डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्त्वाखाली मगो रायझझिंग फोंडा पॅनलने 15 पैकी सर्वाधिक 7 जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यांचे केवळ 4 उमेदवार निवडून आले आहेत. आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पॅनलने तब्बल 10 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे रवी नाईक हे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. त्यात फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक विश्वनाथ दळवी यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.
मंत्री रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र विजयी
फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक हे दाग-खडपाबांध प्रभाग 5 मधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत ते पंडितवाडा प्रभाग 11 मधून निवडून आले होते. त्यांचे धाकटे चिरंजीव रॉय नाईक हे शांतीनगर प्रभाग 1 मधून विजयी झाले आहेत. यापूर्वी सन 2008 मध्ये त्यांनी पालिका निवडणूक लढविली होती. यंदाच्या निवडणुकीत ते विजयी झाल्याने फोंड्यातील सक्रीय राजकारणात त्यांचा प्रवेश झाला आहे. दोन्ही पुत्र विजयी झाल्याने मंत्री रवी नाईक यांचा राजकीय प्रभाव वाढला आहे.









