वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात येत्या चार दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा प्रथम टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदारसंघांच्या परिसिमनानंतर जम्मू भागातील मतदारसंघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काश्मीर खोरे आणि जम्मू विभाग यांच्यातील जागांचे अंतर पुष्कळ कमी झाले आहे. जम्मू भागात 43 तर काश्मीर खोऱ्यात 47 विधानसभा जागा आहेत. जम्मू भागात जागांची संख्या वाढल्याने भारतीय जनता पक्षाला लाभ होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.
जम्मू भागात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करीत आहे. या भागात 13 जागांवर मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या जागांवरही चांगली कामगिरी करण्याचा या पक्षाने प्रयत्न चालविला असून त्यांच्यातील काही जागा पदरात पडल्यास पक्षाचे विधानसभेत वजन वाढण्याची शक्यता आहे. 30 हिंदू बहुल मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती सुदृढ मानली जात आहे. या राज्यात बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता आहे.









