कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीची ताकद आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवांमुळे विरोधी पक्ष कमजोर झालेले दिसतात. अशा काहीशा एकतर्फी राजकीय वातावरणामुळे सध्या महायुतीतील सत्ताधारी घटक पक्षांमध्येच सत्तास्पर्धा निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. रायगडात पालकमंत्रीपदावरून शिवसेना-राष्ट्रवादीत निर्माण झालेला वाद शमताना दिसत नाहीये. रत्नागिरीत माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रवेशावरून शिंदे शिवसेनेत समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे भाजप मात्र नियोजनबद्धरित्या कोकणात आपल्या पक्षाचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. एकेकाळी रायगड जिल्ह्यात प्रभावी राहिलेल्या शेकापलाही ओहोटी लागली आहे. रत्नागिरीत सामंत बंधूंनी ठाकरे शिवसेना खाली करण्याचा सपाटा लावला आहे. सिंधुदुर्गात मात्र ठाकरे शिवसेनेचे महत्त्वाचे शिलेदार अद्याप पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आहेत. सिंधुदुर्गातील हा अपवाद वगळता कोकणात महाविकास आघाडीची धार आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवामुळे विरोधी पक्ष कमजोर झालेले दिसतात. अशा प्रकारच्या काहीशा एकतर्फी राजकीय वातावरणामुळे महायुतीतील सत्ताधारी घटक पक्षांमध्येच सध्या सत्तास्पर्धा रंगल्याचे पहावयास मिळत आहे. विशेषकरून कोणत्याही वादात न पडता भाजपने कोकणात पक्ष संघटना वाढीसाठी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केल्याचे दिसते. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या भाजप संपर्कमंत्रीपदी झालेल्या निवडीतून ही बाब अधोरेखित होते. दोन्ही जिल्ह्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी राज्याचे माहिती तंत्रशिक्षण मंत्री आशिष शेलार यांची रायगड तर मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांची रत्नागिरी संपर्कमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यावर प्रशासकीय तसेच राजकीय वर्चस्व ठेवण्याबरोबरच शासकीय निधीवर नियंत्रण राहत असल्याने सत्तेतील घटक पक्षांचा एखाद्या विशिष्ट जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह असतो. अशाच प्रकारचा आग्रह रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धरला गेला. मात्र अखेरच्या क्षणी रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांचे नाव जाहीर झाले अन् वादाला तोंड फुटले. पालकमंत्रीपदी तटकरेंची वर्णी लागल्यानंतर त्या विरोधात शिवसेनेची नाराजी उफाळून आली. शिवसेनेचे रायगडातील ज्येष्ठ नेते तथा कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी जाहीरपणे तटकरेंच्या निवडीला विरोध केला. पालकमंत्रीपदावर शिवसेनेचाच हक्क आहे, असा पवित्रा घेत शिवसैनिकही प्रचंड आक्रमक झाले. परिणामत: तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची वेळ महायुती सरकारवर आली. पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू झालेला हा खडखडाट अद्याप कायम आहे.
रायगड जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत. मात्र त्यापैकी एकालाही मंत्रीपद मिळालेले नाही. अशातच भाजपने जेथे आपल्या पक्षाचे जेथे पालकमंत्री नाहीत तेथे संपर्कमंत्री नेमले आहेत. रायगड जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महायुतीतील अन्य पक्षाचा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात आपल्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची कामे व्हावीत. त्यांना सत्तेचं बळ मिळावं, या उद्देशाने भाजपने संपर्कमंत्री पदाच्या माध्यमातून पक्षाची एक समांतर यंत्रणा रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत केली आहे. याची झलक रत्नागिरीतही बघायला मिळत आहे. रत्नागिरी संपर्कप्रमुख म्हणून नीतेश राणे यांनी आपल्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षवाढीचा मंत्र दिला. त्यासाठी खंबीरपणे आपण तुमच्या पाठीशी राहू, असा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने एकही उमेदवार दिला नव्हता. सिंधुदुर्गात विद्यमान कॅबिनेट मंत्री नीतेश राणे हे भाजपचे एकमेव उमेदवार होते. यामागचे कारण लोकसभा निवडणूक सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची हक्काची जागा शिंदे शिवसेनेने भाजपला सोडली होती. या जागेवर भाजपकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे खासदार म्हणून विजयी झाले. त्यामुळे भाजपने विधानसभेत गुहागरच्या जागेसाठी विशेष अट्टाहास धरला नाही. ती जागा शिवसेनेला सोडली. विधानसभा निवडणूक काळात महायुतीत निश्चितच उत्तम समन्वय साधला गेला. त्यामुळे कोकणात चांगले यश महायुतीला मिळाले. कोकणातील रायगडमधील सातच्या सात, रत्नागिरीत पाचपैकी चार तर सिंधुदुर्गात तिन्ही जागा महायुतीने जिंकल्या. पण विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्वच प्रमुख घटक पक्षांनी आपापला पक्ष वाढविण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संकटमोचकाची भूमिका निभावणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरी जिल्हा हे प्रभावक्षेत्र आहे. त्यांच्या सोबतीला आता उत्तर रत्नागिरीत गृहराज्यमंत्री योगेश कदमही आहेत. रत्नागिरीत उदय सामंत आणि त्याचे ज्येष्ठ बंधू आमदार किरण सामंत यांनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आहे. ठाकरे सेनेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. पक्ष संघटना वाढीच्या या मोहिमेत भाजपही मागे नाही. मात्र भाजपने सध्या तरी पक्षप्रवेशावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसत नाही. केंद्र व राज्यातील सत्तेच्या पाठबळावर जास्तीत-जास्त लोकांमध्ये जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम काम करावे, शासनाच्या कल्याणकारी योजनांद्वारे लोकांना भाजपशी जोडावे, यादृष्टीने भाजपने काम सुरू केले आहे. जनतेसाठी कार्यरत असताना काही अडचणी निर्माण झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी थेट संपर्क करू, असा विश्वास राणे आणि शेलार यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. यातून भविष्यात कोकण प्रदेशावर कब्जा मिळवण्याचे भाजपचे डावपेच स्पष्ट होत आहेत. आता त्यात भाजपला कितपत यश येईल हे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट होईल. खासदार नारायण राणेंमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप अधिक बलवान झाली आहे. मात्र तेथे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव नीलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शत-प्रतिशत भाजप आणि महायुतीचा ताळमेळ कसा राखला जातो, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
महेंद्र पराडकर








