दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांशी चर्चा लोकसभा निवडणूक तयारीचा घेतला आढावा
प्रतिनिधी / पणजी
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून गोव्यात भाजपतर्फे लवकरच महाजनसंपर्क अभियानास प्रारंभ करण्यात येणार आहे. बुधवारी दिल्लीस गेलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या तयारीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीस गेलेले भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, केंद्रीय नेते बी. एल. संतोष यांचीही बैठकीस उपस्थिती होती.
बुधवारी मंत्रिमंडळ बैठक उकरल्यानंतर मुख्यमंत्री तडकाफडकी दिल्लीस निघाले होते. या दिल्ली वारीमुळे राज्यात अफवांना ऊत आला होता. भाजपात दाखल झालेल्या आठ आमदारांपैकी तिघांचा मंत्रिमंडळात समावेश करून फेरबदल करण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु कालपर्यंत तरी ती प्रत्यक्षात आलेली नव्हती.
संसदेच्या तिन्ही जागांसाठी मोर्चेबांधणी
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा यांच्या तीन जागांसाठी जोरदार मोर्चेबांधणी झाल्याचे वृत्त आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याची तयारी भाजपने केली असून त्याचाच भाग म्हणून लवकरच राज्यात महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात येणार आहे.
राज्यसभेसाठी भाजपचा विजय निश्चित
राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपकडे आवश्यक संख्याबळ असल्यामुळे राज्यसभा खासदार भाजपचाच होईल हे निश्चित आहे. लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी मतदारांनी कौल द्यावा लागणार असल्याने महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजप तेही प्रयत्न करणार आहे.
दिल्ली दौरा आटोपून मुख्यमंत्री गुऊवारी गोव्यात परतले. त्यासंबंधी माहिती देताना त्यांनी सदर दौरा येत्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी होता, असे सांगितले. देशातील भाजप सत्ता असलेल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीसाठी बोलावले होते. त्यात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीची तयारी हाच विषय होता, असे मुख्यमंत्री म्हणाले.