वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी सूची रविवारी घोषित केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांचा समावेश या सूचीत करण्यात आलेला नाही. गुप्ता यांच्या स्थानी विक्रम रंधावा यांना गांधी नगर या जम्मू विभागातील मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ परिसीमनानंतर बाहू या नावाने ओळखला जात आहे. पक्षाच्या या सूचीत 10 उमेदवारांची नावे आहेत.
लोकप्रिय नेते भारत भूषण यांना कथुआ मतदारसंघातून, तर गुलाम मोहम्मद मीर यांना हंडवारा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मीर यांचा संघर्ष जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन यांच्याशी होणार आहे. सज्जाद लोन यांना भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाठिंबा दिला होता. तथापि, ते निवडून येऊ शकले नाहीत, अशी माहिती देण्यात आली.
मुस्लीम उमेदवारांनाही महत्व
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांमध्ये बहुसंख्य उमेदवार हिंदू आहेत. जम्मू विभागात मतदारसंघांची संख्या 43 असून हा हिंदूबहुल भाग आहे. साहजिकच तेथे या पक्षाने हिंदू उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. या भागात भारतीय जनता पक्षाचा प्रभावही मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, यावेळी या पक्षाने काश्मीर खोऱ्यातील मुस्लीम बहुल मतदारसंघांमध्येही अनेक उमेदवार उभे केले आहेत.
समतोल साधण्याचा प्रयत्न
काश्मीर खोऱ्यातील कर्नाहृ सोनवारी आणि गुरेझ मतदारसंघांमधून भारतीय जनता पक्षाने अनुक्रमे इद्रिस कर्नाही, अब्दुल रशीद खान आणि फकीर मुहम्मद खान यांना उमेदवारी दिली आहे. तर जम्मू विभागामध्ये उधमपूर पूर्व मतदारसंघातून आर. एस. पठाणीया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नसीर अहमद लोन यांना बांदीपोरा मतदारसंघातून उतरविण्यात आले आहे.
तीन टप्प्यांमध्ये मतदान
जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी 18 सप्टेंबर. 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. एकंतर मतदारसंघांची संख्या 90 असून त्यांच्यापैकी 43 जम्मू विभागात, तर 47 काश्मीर विभागात आहेत. मतदारांची संख्या 88 लाखांहून अधिक आहे. 80 च्या दशकात दहशतवादामुळे काश्मीर खोरे सोडण्याची वेळ आलेल्या हिंदू विस्थापितांनाही मतदानाचा अधिकार आहे. सर्व मतदारसंघांमध्ये मतगणना 6 ऑक्टोबरला होईल. हरियाणातही विधानसभा निवडणूक होत असून तेथील मतगणनाही 6 ऑक्टोबरलाच होणार आहे.









