अमित शहा यांनी भाजप उमेदवारांचा केला प्रचार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव उत्तरचे भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी शहरात रोड शो केला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप महानगर अध्यक्ष अनिल बेनके, डॉ. रवी पाटील, खासदार मंगला अंगडी यांच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला. हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. कर्नाटकात भाजपचीच सत्ता येणार असून बेळगाव उत्तरमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.
धर्मवीर संभाजी चौकापासून सायंकाळी 7 वाजता रोड शोला प्रारंभ झाला. किर्लोस्कर रोड, हुतात्मा चौक, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजारमार्गे संयुक्त महाराष्ट्र चौकात रोड शोची सांगता झाली. बेळगाव उत्तर मतदारसंघात भाजपने केलेल्या विकासकामांमुळे डॉ. रवी पाटील यांचा विजय निश्चित आहे. भाजपने जाती-पातीचे राजकारण न करता विकासात्मक मुद्द्यांच्या आधारे बेळगाव शहराचा विकास केल्यामुळे भाजपचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असे त्यांनी रोड शो दरम्यान सांगितले.
भारत माता की जय, बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी रोड शो परिसर दणाणून निघाला होता. भगवे फेटे व हातामध्ये कमळ चिन्ह घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असल्याने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कर्नाटकात एक सक्षम सरकार दिले. त्यांच्याच नेतृत्वात आता पुन्हा भाजप सत्तेत येईल, काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी कर्नाटकात हिंदुत्ववादी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
ऑटोनगर परिसरात डॉ. रवी पाटील यांचा प्रचार
शनिवारी सकाळी नेहरुनगर येथील बसवाणा मंदिरापासून प्रचाराला प्रारंभ झाला. पहिला क्रॉस, दुसरा व तिसरा क्रॉस परिसरात जोरदार पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर ऑटोनगर परिसरात डॉ. रवी पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपने मागील पाच वर्षांत केलेल्या विकासामुळे डॉ. रवी पाटील यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
समर्थनगर, मल्लिकार्जुननगर, केएचबी कॉलनी, फुलबाग गल्ली, शाहूनगर, महाद्वार रोड, तानाजी गल्ली या परिसरामध्ये प्रचार करण्यात आला. महिलांनी फुलांचा वर्षाव करत डॉ. रवी पाटील यांचे स्वागत केले. भारत माता की जय अशा घोषणा देत शेकडोंच्या संख्येने महिला व युवक पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या भेटी घेतल्या.









