देशभरात आयोजित होणार कार्यक्रम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप 24 फेब्रुवारी रोजी देशातील सर्व जिल्हय़ांमध्ये ‘नमो किसान सन्मान दिन’ साजरा करणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजप किसान मोर्चाकडून सर्व जिल्हय़ांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष तसेच खासदार राजकुमार चाहर यांच्या नेतृत्वात 24 फेब्रुवारी रोजी ‘नमो किसान सन्मान दिन’ आयोजित केला जाणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रवक्ते मनोज यादव यांनी बुधवारी दिली आहे. सर्व जिल्हय़ांमध्ये शेतकरी संमेल तसेच शेतकरी सभांचे आयोजन करत भाजप नेते आणि कार्यकर्ते योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली होती. या योजनेच्या माध्यमातून देशातील 11 कोटी शेतकऱयांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी बिहारच्या दौऱयावर असणार असून त्यादरम्यान किसान-मजदूर संमेलनाला ते संबोधित करणार आहेत.









