केंद्रीय मंत्री करणार मतदारसंघांचा दौरा ः 2024 च्या निवडणुकीची तयारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रपती अन् उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडल्यावर भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करणार आहे. दीड वर्षांनी होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रीय तसेच भाजपच्या राज्यातील मंत्र्यांसह पदाधिकाऱयांना 17 ऑगस्टपासून विशेष जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. भाजपने आता आगामी लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांच्या मदतीने 400 हून अधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. तर घटक पक्षांना 54 जागा मिळाल्याने एकूण संख्याबळ 357 झाले होते. आगामी निवडणुकीपूर्वी या मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा महिन्यात एकतरी दौरा व्हावा अशी भाजपची योजना आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला 144 मतदारसंघांमध्ये यश मिळाले नव्हते. या मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा 15 दिवसांत एक दौरा होणार आहे.
लोकसभा मतदारसंघांनुसार पक्ष मायक्रो मॅनेजमेंट करणार आहे. याच्या अंतर्गत विजयी झालेल्या लोकसभा मतदारसंघांच्या अंतर्गत येणाऱया परंतु 2019 मध्ये पक्ष पिछाडीवर राहिलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये राज्यातील मंत्री स्थितीचा आढावा घेत त्रुटी दूर करण्याची रणनीति आखणार आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांसोबत मिळून भाजप 400 हून अधिक जागा जिंकण्याच्या रणनीतिवर काम करत आहे. काही मतदारसंघांमध्ये भाजप तिसऱया क्रमांकावर राहिला होता, अशा मतदारसंघांमध्ये स्वतःचा प्रभाव वाढविण्याचे काम भाजपकडून केले जातेय. या मतदारसंघांमधील केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी थेट संपर्क साधला जात असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
शासकीय योजनांच्या कक्षेत अधिकाधिक लोकांना सामील करण्याचा प्रयत्न आहे. 2019 मध्ये विजय मिळालेल्या मतदारसंघांमध्ये आतापर्यंत लाभार्थींच्या संख्येत किती वाढ झाली आहे याचेही आकलन करण्यात आले असल्याचे या नेत्याने सांगितले आहे.
मतदारसंघांची स्थिती
भाजपच्या सर्व लोकसभा खासदारांना स्वतःच्या मतदारसंघात पक्षीय स्थितीकरता दिसून येणाऱया त्रुटी ओळखण्यास सांगण्यात आहे. या त्रुटींची माहिती संबंधित लोकसभा मतदारसंघांच्या दौऱयाची जबाबदारी असणाऱया केंद्रीय मंत्र्यांना दिली जाणार आहे. 6 महिन्यांनी पुन्हा समीक्षा करत संबंधित त्रुटी दूर झाल्या की नाहीत हे पाहिले जाणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांना जबाबदारी
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सहारनपूर, नगीना आणि बिजनौर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अशाचप्रकारे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना रायबरेली, मऊ, घोसी, श्रावस्ती आणि आंबेडकर नगर मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना मुरादाबाद, अमरोहा आणि मैनपुरी मतदारसंघाची जबाबदारी तर केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांना जौनपूर, गाजीपूर तसेच लालगंज मतदारसंघाची जबाबदारी मिळाली आहे.
अर्थमंत्र्यांकडे बारामतीचा भार
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना लुधियाना, संगरूर आणि हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघाची जबाबदारी मिळाली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पंजाबमधील आनंदपूर साहिब मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे बुलढाणा अन् औरंगाबाद मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघाची जबाबदारी मिळाली आहे.









