दोन उमेदवार बिनविरोध : विश्वनाथ दळवी यांची हॅट्ट्रिक : मगोच्या विद्या पुनाळेकर भाजपाच्या गोटात
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपाने आपले दोन उमदेवार बिनविरोध निवडून आणीत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. खडपाबांध प्रभाग 7 मधून भाजपाचे उमेदवार तथा नगरसेवक विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी व एका नाट्यामय घडामोडीत प्रभाग 13 मधून माजी नगरसेविका विद्या पुनाळेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष असलेल्या दळवी यांनी बिनविरोध निवडून येतानाच विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. प्रत्यक्ष रिंगणात उतरण्यापूर्वीच भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने 15 पैकी 13 प्रभागांत मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुऊवारी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे दोन बिनविरोध सोडून 43 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येत्या 5 मे रोजी मतदान व 7 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

विश्वनाथ दळवी यांची हॅट्ट्रिक
खडपाबांध प्रभाग 7 चे उमेदवार तथा नगरसेवक विश्वनाथ दळवी यांच्याविरोधात भारत पुरोहित यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर यशस्वी मध्यस्थी करीत पुरोहित यांना शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेण्यास तयार करण्यात आले. त्यानुसार गुऊवारी सकाळी 11 वा. पुरोहित यांनी निर्वाचन अधिकाऱ्यांसमोर उपस्थिती लावून अर्ज मागे घेतला व दळवी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. दळवी यांचे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. विश्वनाथ दळवी हे पालिका निवडणुकीत याच प्रभागातून सन 2013 व 2018 मध्ये सलग दोनवेळा मोठ्या मत्ताधिक्क्याने विजयी झाले होते. तिसऱ्यांदा थेट बिनविरोध निवडून येत त्यांनी आपला राजकीय प्रभाव सिद्ध केला आहे. फोंडा पालिकेच्या सध्याच्या कार्यकाळात ऑगस्ट 2020 मध्ये आठ महिने ते नगराध्यक्षही राहिले असून सर्वांत तऊण नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना लाभला. पक्षीय पातळीवर स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत राजकीय वर्चस्वाला महत्त्व येण्याच्या हल्लीच्या काळात फोंडा पालिकेवर बिनविरोध निवडणूक येण्याचा विक्रमही आता त्यांच्या नावावर नोंद झाला आहे. दळवी व पुनाळेकर यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपासाठी फोंडा पालिकेची निवडणूक सोपी झाली असून ही विजयाची नांदी ठरली आहे.

विद्या पुनाळेकरांचा मगोला धक्का
आणखी एका नाट्यामय राजकीय घडामोडीमध्ये भाजपाने प्रभाग 13 मधील दर्शना श्याम नाईक या आपल्याच उमेदवाराला शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेण्यास लावून मगो समर्थक असलेल्या विद्या पुनाळेकर यांना बिनविरोधविरोध निवडून आणले. अगदी शेवटचा अर्धा तास उरलेला असताना दर्शना नाईक या निर्वाचन अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्या व त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. फोंड्यात या घडामोडी सुऊ असतानाच पुनाळेकर यांनी पणजी येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश केला. या वेगवान व नाट्यामय घडामोडीतून भाजपाने पंधरापैकी दोन जागांवर आपले उमेदवार निवडून आणित मगो पक्षासह इतर विरोधकांना धक्का दिला आहे.
भाजपाच्या या राजकीय खेळीमुळे फोंडा पालिका निवडणुकीच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. उर्वरीत तेरा प्रभागांमध्ये भाजपाने आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अन्य पक्षांचे नेते व उमेदवार सावध झाले असून या नवीन घडामोडीमुळे निवडणूक प्रचाराची रंगत वाढली आहे.









