पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकासाठी तीन शिलेदार मैदानात
मुंबई / प्रतिनिधी
राज्यात लवकरच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांही होणार असून भाजपने त्याअनुषंगानेही आपली वाटचाल सुरू केली आहे. पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या तीन मतदारसंघांमध्ये भाजप आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदवीधर निवडणुकांसाठीही भाजपने मास्टरप्लॅन आखल्याची माहिती आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर निवडणुकीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले असून त्यांनी तीन खेळाडू मैदानात उतरवले आहेत. पुण्यासाठी राजेश पांडे, नागपूरसाठी सुधाकर कोहळे आणि संभाजीनगर मतदारसंघासाठी संजय केनेकर यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी या तीन जणांवर सदस्य नोंदणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने यासाठी संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले आहे.तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव निर्वाचित मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी मुंबईत जिल्हानिहाय बैठक घेत,राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे.









