विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणी द्रमुक अडचणीत
वृत्तसंस्था/ चेन्नई
विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणी तामिळनाडूतील सत्तारुढ पक्ष द्रमुकवरील दबाव वाढवत भाजपने पीडितेसाठी न्यायाची मागणी करत मदुराई ते चेन्नईपर्यंत न्याय यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. बलात्काराचा आरोपी हा द्रमुकचा सदस्य असून या प्रकरणी सत्य लपविण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केला.
भाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या प्रमुख उमारथी राजन यांच्या नेतृत्वात ही न्याय यात्रा काढली जाणार आहे. मदुराई ते चेन्नईपर्यंत ही न्याययात्रा 3 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. चेन्नईत या यात्रेच्या समारोपप्रसंगी तामिळनाडूच्या राज्यपालांना निवेदन सोपविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मदुराई ते चेन्नई हे अंतर सुमारे 450 किलोमीटर आहे. अण्णा विद्यापीठाच्या परिसरात एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेवरून तामिळनाडूतील राजकारण चांगलेच तापले आहे. या गुन्ह्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या घटनेच्या विरोधात अण्णामलाई यांनी शुक्रवारी अनोखे निदर्शन केले होते. यादरम्यान अण्णामलाई यांनी चाबकाचे फटके मारून घेतले होते. तर अण्णा विद्यापीठातील घटनेवरून द्रमुक सरकार बॅकफूटवर असुन विरोधी पक्ष मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
या प्रकरणावरून चित्रपट अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचा प्रमुख दलपति विजय यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती.









