10 वर्षांनंतर नगरपालिकेत स्पष्ट बहुमत. मुख्यमंत्र्यांचा करिष्मा चालला. मतदानात विशेषत: युवा पिढीकडून मोठ्या अपेक्षा.
रविराज च्यारी. डिचोली
साखळी नगरपालिका निवडणूकीचा निकाल अनेक गोष्टींचा उलगडा करणारा ठरला आहे. गेल्या 2018 च्या नगरपालिका व नंतर 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत साखळी शहरातील मतदारांकडून भाजपचा मोठा अपेक्षाभंग झाला होता. यावेळी मात्र शहरातील मतदान कमी होण्याची कारणे शोधत त्याप्रमाणे सर्व रणनिती आखत भाजपने आपली खेळी खेळली. या खेळीचे कर्णधार अर्थातच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत होते. या खेळीत मात्र यावेळी भाजपला चांगले यश मिळवून दिले. कधीच पालिका किंवा विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर न राहिलेल्या साखळी शहरातील मतदारांनी भाजपला चांगलीच साथ दिली आहे. संपूर्ण निकालाचा आलेख घेतल्यास साखळी शहर व नगरपालिकेवर भाजपने आपली पडक मजबूत करण्यास प्रारंभ केला आहे. 12 पैकी निर्विवाद 11 प्रभागांमध्ये विजय मिळवून भाजपने साखळी शहरावरील आपले स्थान बळकट बनवाण्याच्या दृष्टीने मारलेली पावले योग्य दिशेने जात असल्याचे झालेल्या मतदानातून लक्षात येते. दोन प्रभागांमध्ये बिनविरोध नगरसेवक निवडून आल्यानंतर 10 प्रभागांमध्ये निवडणुका संपन्न झाला होत्या. या दहा प्रभागांमधून सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक नगरसेवकांचा आकडा पार करणे भाजपचे लक्ष्य होते. त्यादृष्टीने भाजप कार्यकर्ते व नेत्यांनी प्रत्येक प्रभाग लक्ष्य बनविला होता. सर्व प्रभगांवर व प्रभागातील मतदारांवर लक्ष ठेवले होते. सर्व कार्यकर्त्यांना घरे विभागून देत त्या घरांमधील सर्व मतदारांची मते मारून घेण्याचे आव्हान दिले होते. तसेच बाजार सारख्या परिसरातील काँग्रेसच्या पारंपरिक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये ओढण्याचे मोठे काम भाजपने केले होते. हि सुध्दा एक जमेची बाजू ठरली.
या आव्हानामुळेच साखळीतील मतदानाची टक्केवारी वाढली होती. वाढलेल्या टक्केवारीचा लाभ कोणाला होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु साखळीतील सर्व दहाही प्रभागांमध्ये भाजपचेच उमेदवार निवडून येतील हा दृढ विश्वास मुख्यमंत्री व इतर नेते व्यक्त करीत होते. हा विश्वास खरा ठरला आणि भाजपने सर्व दहाही जागा निर्विवादपणे जिंकल्या. गेल्याच वर्षी 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला साखळी नगरपालिका क्षेत्रात मतदान काँग्रेसच्या तुलनेत कमी झाले होते. काँग्रेसचे धर्मेश सगलानी यांनी साखळी नगरपालिका क्षेत्रात मतांची आघाडी मिळवली होती. परंतु सात पंचायतींमधील मतदारांनी डॉ. प्रमोद सावंत यांना साथ देत विजयी केले. या नगरपालिका निवडणुकीत दहा प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांना पडलेली मते एकत्रित केल्यास ती 3365 होतात, तर टुगेदर फॉर साखळी या पेनलची एकूण मते 2089 इतकी होतात. टुगेदर फॉर साखळीच्या उमेदवारांपेक्षा भाजपच्या उमेदवारांना म्हणजेच भाजपच्या पारड्यात 1276 मते जास्त पडली आहे. भाजपला या निवडणुकीत हि मिळालेली आघाडी आहे. आता हि मतांची आघाडी पुढील लोकसभा व नंतर अत्यंत महत्वाच्या विधानसभा निवडणुकीत राखून ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. या निकालात भाजपचे सर्व उमेदवार हे पहिल्या क्रमांकावरच राहिले. या निवडणुकीत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केलेल्या टुगेदर फॉर साखळी या पेनलचे उमेदवार आठ प्रभागांमध्ये दुस्रया जागेवर तर प्रभाग 1 व 7 या दोन प्रभागांमध्ये तिस्रया क्रमांकावर राहिले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्र. 1 मध्ये अपक्षपणे उभे राहिलेले भाजपचेच एक सक्रिय कार्यकर्ते संतोष हरवळकर हे दुस्रया क्रमांकावर राहिले. या प्रभागातील विजयी उमेदवार यशवंत माडकर यांच्यापेक्षा त्यांना 44 मतेच कमी पडली.
या निवडणुकीत 10 प्रभागांसाठी एकूण 31 उमेदवार रिंगणात होते. त्यापेक्षा 20 उमेदवार हे भाजप व टुगेदर फॉर साखळी या पेनलचे होते. तर 11 उमेदवार हे अपक्षपणे निवडणूक लढत होते. या सर्व अपक्ष उमेदवारांना एकूण 544 मते पडली आहेत. तर एकूण मतदानातील 72 मते बाद झाली आहेत. एकूण 6932 पैकी 6070 मतदारांनी 87.56 टक्के मतदान केले होते. जे गेल्या नगरपालिका निवडणुकीपेक्षा अडिच टक्क्यांनी जास्त होते. या निवडणुकीत भाजपने पध्दतशीरपणे आखलेली रणनीती व पध्दतशीरपणे केलेला प्रचार यामुळे हे मोठे यश मिळविणे शक्य झाले. आता या मतदानाच्या उलट लोकांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान भाजप व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर आहे. या निवडणुकीत भाजप कार्यकर्ते व नेत्यांकडून अनेकांना सरकारी किंवा खासगी नोकरीची आश्वासने देण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी साखळी नगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. त्याचबरोबर साखळी शहराचा व एकंदरीत संपूर्ण नगरपालिका क्षेत्राचा सर्वांगिण विकास साधण्याचेही आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आता नव्याने सत्ता.स्थापन करण्राया नगरपालिका मंडळासमोर आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये जर भाजप व मुख्यमंत्री स्वत: यशस्वी ठरतात, तर येण्राया विधानसभा निवडणुकीत भाजपला साखळी मतदारसंघात कोणीही टक्कर देऊ शकणार नाही, कशी मजबूत पकड भाजपची या नगरपालिकेवर व मतदारसंघावर निर्माण होणार आहे.









