हैदराबादमध्ये 2-3 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ः पंतप्रधान मोदी होणार सहभागी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भाजपने तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बैठक हैदराबादच्या नोवोटेल हॉटेलमध्ये 2-3 जुलै रोजी होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व दिग्गज नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील आणखीन एका राज्यात कमळ फुलविण्याच्या योजनेंतर्गत भाजपने आता तेलंगणावर लक्ष केंद्रीत केल्याचे मानले जात आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत 300 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. राष्ट्रीय कार्यकारिणी ही भाजपची सर्वात प्रमुख आणि शक्तिशाली शाखा आहे. पक्षाची दिशा आणि रणनीती या बैठकीत ठरविली जात असते.
चालू वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये सध्या भाजप सत्तेवर आहे. गुजरातमध्ये 29 वर्षांपासून भाजप अपराजित राहिला आहे. तर हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसची आलटून-पालटून सत्ता येत राहिली आहे. भाजप आता कुठल्याही स्थितीत दोन्ही राज्यांमधील सत्ता कायम राखू पाहत आहे.
हैदराबादचीच निवड का?
तेलंगणा हे राज्य तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसचा बालेकिल्ला आहे. तेथे टीआरएस सत्तेवर असून विरोधी पक्ष काँगेसची स्थिती खूपच ढासळली आहे. भाजप या स्थितीचा लाभ घेत राज्यात पक्षाचा प्रभाव वाढवू पाहत आहे. याचमुळे भाजपने मागील काही वर्षांमध्ये तेलंगणावर विशेष लक्ष दिले आहे. मागील वर्षी झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार केला होता. मातब्बर नेत्यांना तेथे प्रचारासाठी उतरविण्यात आले होते. भाजपने तेथे उल्लेखनीय यश मिळविले होते. अलीकडेच तेथील भाजप प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण यांना पक्षाने उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलंगणा स्थापना दिन अन् शाह
केंद्रीय संस्कृती मंत्रालयाकडून गुरुवारी (आज) दिल्लीत तेलंगणा स्थापना दिन सोहळा आयोजित केला जाणार आहे. या सोहळय़ात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, विदेश राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यादेखील यामध्ये भाग घेणार आहेत.









