2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी ः तेलंगणात सर्वाधिक चुरस
वृत्तसंस्था / हैदराबाद
भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वतःची पूर्ण शक्ती दक्षिणेतील 5 राज्यांमध्ये झोकून देण्याची तयारी केली आहे. केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत लोकसभेचे 129 मतदारसंघ आहेत. भाजप येथे संघाची पार्श्वभूमी असणारे चेहरे, प्रादेशिक पक्षांमधील असंतुष्ट नेत्यांना एकत्र आणण्यासह विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय बिगर-राजकीय प्रतिभांच्या लोकप्रियतेची मदत घेण्याच्या रणनीतिवर कार्यरत आहे. भाजपच्या हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मिशन साउथचा रोडमॅप निश्चित करण्यात आला होता.
याच्या अंतर्गत आगामी 18 महिन्यांना प्रत्येकी 6 महिन्यांच्या तीन टप्प्यांमध्ये विभागून या मोहिमेला वेग देण्यात येईल. उत्तर भारतात पक्षविस्ताराला आता मर्यादा आल्याने दक्षिणेत प्रभाव वाढवावा लागणार असल्याचे भाजपचे मानणे आहे. याच रणनीतिच्या अंतर्गत भाजपने केरळमधून पी.टी. ऊषा, आंध्रप्रदेशातून विजयेंद्र प्रसाद, कर्नाटकातून वीरेंद्र हेगडे आणि तामिळनाडूतून इलैया राजा यांना राज्यसभेवर पाठविले आहे. मिशन साउथमध्ये तेलंगणातील टीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि तामिळनाडूत द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन हे भाजपच्या मुख्य निशाण्यावर आहेत.
भाजपची नवी योजना
भाजपने 2018 च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणात एका जागेवर विजय मिळविला होता आणि मतांची हिस्सेदारी 7 टक्के राहिली होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने 4 जागा जिंकल्या आणि मतांची हिस्सेदारी 19.7 टक्के झाली. 2016 मध्ये हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपला 4 ठिकाणी यश मिळाले होते. 2020 मध्ये हा आकडा 48 वर पोहोचला. 35 टक्के मतांसह भाजप आणि टीआरएसचे शहरातील राजकीय बळ जवळपास समान झाले होते.
तेलंगणावर अधिक लक्ष
भाजपसाठी दक्षिणेतील सर्वात महत्त्वपूर्ण रणभूमी तेलंगणा आहे. या राज्यात मागील 3 वर्षांपासून भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. तेलंगणात टीआरएसमधून बाहेर पडलेले एटाला राजेंद्र यांनी भाजपची धुरा सांभाळली आहे. भाजपने अनुसूचित जातींसाठी राखी 19 तर अनुसूचित जमातींसाठी राखीव 12 जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे होत आहेत. तर शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हैदराबादमध्ये होते.









