सेलिब्रिटींना पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलगूभाषिक राज्यांमध्ये स्वतःचे बळ वाढविण्याकरता भाजप वलयांकित व्यक्तींना पक्षात सामील करण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नाच्या अंतर्गत जगतप्रकाश नड्डा यांनी शनिवारी माजी क्रिकेटपटू मिताली राज यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता नितिन याची भेट घेतल्याचे समजते. मिताली राज यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा आता सुरू झाली असली तरीही तिने याबद्दल कुठलीही टिप्पणी करणे टाळले आहे.
शमशाबादमध्ये एका हॉटेलमध्ये भाजप अध्यक्षांनी मिताली राज यांची भेट घेत संवाद साधला आहे. नड्डा यांनी या भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांच्या प्रजासंग्राम यात्रेच्या तिसऱया टप्प्यातील समारोपाप्रसंगी हनमकोंडा येथील एका जाहीर सभेला संबोधित केले आहे.
नितिन यांना भाजपमध्ये सामील होण्याचे आवाहन नड्डा यांनी केल्याचे समजते. चित्रपट जगतात नितिन या नावाने प्रसिद्ध नितिन कुमार रेड्डी हे निजामाबादचे रहिवासी आहेत. 2002 साली नितिन यांनी ‘जयम’ या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले होते. तर मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिने जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. राजस्थानात जन्मलेली मिताली सध्या हैदराबादमध्ये वास्तव्यास आहे.
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकप्रिय अभिनेता ज्युनियर एनटीआर याची भेट घेत चर्चा केली होती. या दिग्गज कलाकार तसेच क्रीडापटूंच्या लोकप्रियतेचा लाभ घेत तेलगूभाषिक तेलंगणा अन् आंध्रप्रदेशात भाजपचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तेलंगणात भाजपने बऱयापैकी प्रभाव निर्माण करत सत्तारुढ तेलंगणा राष्ट्रीय समितीसमोर मोठे आव्हान उभे करण्यास यश मिळविले असल्याचे मानले जात आहे.









