सांगली :
महापालिकेच्या आगामी निवडणूकीच्या दृष्टीने भाजपाने आतापासून तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिशन मनपा हातात घेतली असून सांगली मिरजेत बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते, नाराज आणि इच्छूकांच्याही गाठीभेटी सुरू केल्या आहेत. महापालिकेत भाजपा महायुतीचीच सत्ता आणायची असा चंग बांधून कामाला सुरवात करण्यात आली आहे.
शनिवारी १९ जुलै रोजी पालकमंत्री पाटील यांनी संपूर्ण दिवसभर सांगलीमधील गेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे उमेदवार व पराभूत भाजपचे उमेदवार या सगळ्यांबरोबर वैयक्तिक चर्चा केली व संवाद साधला. पुढील निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी प्रत्येकाला व्यक्तिगत सूचना दिल्या. त्याचबरोबर त्यांच्याही तक्रारी, सूचना ऐकूण घेतल्या. प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यामध्ये वाढ करा. नागरिकांशी संपर्क वाढवा. त्यांच्या अडचणी सोडवा, आदी सूचना त्यांनी केल्या आहेत.
त्याचबरोबर भाजप शहर जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष व माजी मंडल अध्यक्ष यांच्याशीही पालकमंत्र्यांनी चर्चा करून कामाचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या किमान साठ जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने व पुन्हा भाजपची व महायुतीची सत्ता सांगली मिरज कुपवाड महापालिकेत आणण्याच्या दृष्टीने त्यांनी सर्वांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुढल्या टप्प्यामध्ये कुपवाड व मिरज येथील नगरसेवक तसेच भाजपच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग हे उपस्थित होते.
- पालकमंत्री आज जिल्हा दौऱ्यावर
पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी २१ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे: सोमवारी सकाळी १०.४० वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) निधीतील योजनानिहाय कामांचा आढावा (सन २०२३-२४ व २०२४-२५) जिल्हा परिषद यंत्रणा. दुपारी २ वाजता सांगली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) निधीतील योजनानिहाय कामांचा आढावा (सन २०२३-२४ व २०२४-२५), दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजी महाराज रमृतिस्थळ, शिराळा आराखड्याबाबत जिल्हास्तरीय समिती बैठक, दुपारी ३.३० वाजता जिल्हा विकास आराखडा बैठक या सर्व बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४.१५ वाजता सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथील पहिला मजला विस्तारीकरण व परिसर सुशोभिकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन सांगली. सायंकाळी ५.१५ वाजता शासकीय रूग्णालय, मिरज येथे शस्त्रक्रियागृह फेज २, ग्रंथालय व डी. एस. ए. मशीन लोकार्पण सोहळा.








