ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपचेच असल्याचा दावा रविवारी झालेल्या भाजप मेळाव्यात करण्यात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून ठाण्यात शह देण्याचा प्रयत्न केला जात असून काही दिवसापूर्वी भाजपने राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात आणि 288 विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रमुखांची निवड केलेली पाहता एक तर शिंदे गटाची बार्गेनिग पॉवर कमी करणे अथवा जे शिंदे गटात गेलेले खासदार आहेत त्यांना भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी खेळी केली जात नाही ना अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कधी काळी भाजपकडे असलेला हाच ठाणे लोकसभा मतदार संघ आनंद दिघे यांनी भाजपकडून घेत त्या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला होता, आता त्याच ठाणे आणि कल्याणमध्ये भाजप शिवसेनेला आव्हान देत आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.न•ा दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आले आणि त्यानंतर भाजपात पक्षांर्तगत पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी झाल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात भाजपने राज्यातील 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रमुख नेमल्याची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा करत असताना भाजपने शिवसेना शिंदे गट आणि भाजपात कसली ही नाराजी नसल्याचे जरी सांगितले असले तरी भाजपच्या या घोषणेनंतर मात्र शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे. भाजपकडून ही घोषणा करताना आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही.
राज्यात जसे आम्ही भाजपचे घटक आहोत भाजपसोबत सत्तेत आहोत तसे केंद्रातही आमच्या 13 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला असून, आम्हाला केंद्रात सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याची खंत शिंदे गटाचे नेते आणि ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांनी काही दिवसापूर्वी बोलून दाखविली होती. आता तर थेट भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघावरच दावा केल्याने पुन्हा एकदा शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे, 2019 ला उध्दव ठाकरे यांनी भाजपला दूर ठेवून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेच्या त्यावेळच्या खासदारांनी जर आम्हाला पुन्हा खासदार व्हायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपण भाजपसोबत जाऊ काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत युती तोडण्याची विनंती अनेक वेळा उध्दव ठाकरेंना केली होती. त्यामुळे भाजपलाही माहीत आहे की शिंदे गटातील खासदारांना भाजपशिवाय पर्याय नाही.
आता भाजप ज्या पध्दतीने दावे करत आहेत ते पाहता एक तर शिंदे गटातील खासदारांनी भाजपमध्ये यावे यासाठी हे दबावतंत्र आहे का? कारण भाजपने यापूर्वीच न•ा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुण्यातील बैठकीत 48 जागा स्वबळावर लढविण्याचा नारा दिला होता. त्यामुळे भाजप स्वबळाची चाचपणी करताना थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भाजपने काल ज्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे, त्यातील ठाणे लोकसभा मतदार संघाचा इतिहास हा तितकाच रंजक आहे. ठाण्याची जागा ही भाजपची कधी काळी हक्काची मानली जात होती. भाजपचे रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी ठाण्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले होते. 2009 च्या लोकसभा पुर्नरचनेपूर्वी ठाणे हा कल्याण-डोंबिवलीसह एकच लोकसभा मतदारसंघ होता. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम कापसे हे शिवसेना-भाजप युतीचे खासदार म्हणून निवडून आले होते. बाबरी मशिद पाडल्यानंतर कापसे यांनी बाबरी पाडल्याचा आनंद म्हणून ठाण्याच्या सेंट्रल मैदानात भाजपची सभा लावली.
या सभेला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना बोलवून त्यांचा उल्लेख खासदार कापसे यांनी देशाचे एकमेव हिंदुहृदयसम्राट असा केला, याने आनंद दिघे अस्वस्थ झाले. हिंदुहृदयसम्राट तर फक्त एकच बाळासाहेब ठाकरे आहेत. भाजप नवे हिंदुहृदयसम्राट का निर्माण करतात असा सवाल दिघेंनी करताना हे शिवसेनेला आव्हान आहे आणि ते मी ठाण्यात चालू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. 1996 च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. ठाण्याच्या जागेचा विषय येताच आनंद दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा सांगितला. राम कापसे व भाजप ठाण्यात चालणार नाहीत असे बाळासाहेब ठाकरे यांना दिघेंनी सांगत शिवसैनिक त्यांचा पराभव करतील असे सांगताना, ठाण्याचा खासदार शिवसेनेचाच होईल असे निक्षून सांगितले.
यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी दिघे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात राज्यातील शिवसेना भाजप युतीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, मात्र दिघे हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. अखेर भाजपने राम कापसे यांना उमेदवारी न देता ही जागा शिवसेनेला सोडली आणि 1996 साली शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे ठाण्यातून खासदार झाले. ठाणे आणि 2009 नंतर नव्याने झालेल्या कल्याण लोकसभा मतदार संघावर शिवसेना भाजप युतीत 2019 पर्यंत शिवसेनेने आपला हक्क सांगितला होता आणि भाजपनेही या जागा शिवसेनेला सोडल्या होत्या, मात्र ती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजपची युती आहे.
भाजपने ठाणे आणि कल्याण या जागांवर दावा केल्यानंतर आनंद दिघे यांच्या विचारांचे पाईक असलेले त्यांचे शिष्य विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघेंचा करारी बाणा दाखविणार का? की भाजपच्या वळचणीला जाणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे








