राजकारण सारखे बदलत असते. डबक्यासारखे ते साचलेले राहात नाही. त्यामुळेच आजचा राजा उद्याचा रंक होतो तर परत कधी त्याचा राजादेखील होतो. सारीपाटावर कोण कसा डाव खेळत आहे, कोणाला कसे दान पडत आहे, कोण सोंगट्या टाकण्यात पटाईत आहे या साऱ्याचा परिणाम कोण जिंकतो आणि कोण हारतो त्यावर होतो. द्युतामध्ये धर्मराज हारला याचा अर्थ तो पुण्यवान नव्हता असे नव्हे तर कौरवांकडे शकुनीसारखा कुटील फासे टाकण्यासाठी होता.

विरोधी पक्षातील गाठीभेटी वाढत आहेत त्या केवळ चहापाण्यापुरत्या नव्हेत. दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यावर नितीश कुमारांनी कोलकात्यात ममता बॅनर्जींची भेट घेतली. तेव्हा सगळे मिळून भाजपला पाणी पाजायचे आहे याचा दीदींनी निर्धार व्यक्त केला. अखिलेश यादव यांच्याबरोबर देखील नितीशची बोलणी झाली. ‘खिचडी पक रही है।’. भाजपकडून विरोधी पक्षांच्या ऐक्य प्रक्रियेतील हवा काढणे देखील सुरु झाले आहे. आमच्याकडे नरेंद्र मोदीसारखा कणखर नेता आहे तर तुमच्याकडे सारे सोम्या गोम्या भरलेत असे सांगत राहुल गांधी, ममतादीदी, केजरीवाल, नितीश, तेजस्वी, अखिलेश, स्टालिन वगैरे मंडळी काय दिवे लावणार? असे विचारले जात आहे. जणू सारे भुरटे चोर. येत्या निवडणुकात कोण कशा सोंगट्या फेकणार हे लवकरच दिसून येणार आहे. पण अशा वेळेसच पुलवामामधील 40 सैनिकांना शहिद केलेली घटना म्हणजे सरकारचा हलगर्जीपणा असे सांगत जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जी मोहीम सुरु केली आहे त्याने सरकार अडचणीत आलेले दिसत आहे. ‘मलिक हे राज्यपाल असताना मूग गिळून का गप्प बसले? तेव्हा ते का बोलले नाहीत?’ असा गृहमंत्री अमित शहा यांनी विचारलेला प्रश्न म्हणजे मलिक हे खोटे बोलत आहेत असे सांगण्याचाच प्रयत्न दिसतोय. ज्यादिवशी ही घटना घडली त्यादिवशीच मी बोललो आहे पण तेव्हा साक्षात पंतप्रधानांनी आपल्याला चूप बसायला सांगितले, असा मलिक यांचा दावा आहे. सत्ताधारी मंडळी मलिक यांना नेता करून सोडणार असेच सारे दिसत आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समाजातील असलेले मलिक यांनी मेघालयाचे राज्यपाल असताना देखील तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात भूमिका घेऊन आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने ते उभे राहिले होते. गमतीची गोष्ट म्हणजे अलीकडील काळात पंतप्रधानांचे खास समर्थक म्हणून ओळखले जाणारे उपराष्ट्रपती जगदीप धनकर हे देखील याच समाजातील आहेत. ते मूळचे राजस्थानातील.
केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता नुकतीच मिळून त्याचा जलवा वाढू लागला असतानाच गेल्या आठवड्यातील दोन घटनांनी स्वत:ला सामान्य माणसाचा पक्ष म्हणवणाऱ्या ‘आप’ ला चांगलेच पंक्चर केले आहे. केजरीवाल यांनी आपले अधिकृत निवासस्थान सुशोभित करण्यासाठी कोविडच्या भयानक काळात 45 कोटी रुपये खर्च केले होते या गौप्यस्फोटाने पक्षाला घायाळ केले आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर दिल्लीतील अबकारी कर घोटाळ्यात आरोपपत्र दाखल झाल्याने केजरीवाल यांच्या विरोधकांनी उचल खाल्ली आहे. केजरीवाल यांनी कर्नाटकात 200 उमेदवार उतरवले असले तरी त्यांचा पक्ष फारसा स्पर्धेतच दिसत नाही. दरम्यान योगेंद्र यादव यांच्या सल्ल्याने कर्नाटकात केली गेलेली एक निवडणूकपूर्व चाचणी राजकीय वर्तुळत चर्चेचा विषय बनली आहे. राज्यातील 224 पैकी 203 मतदारसंघात एकूण 50,000 लोकांच्या वर्गव्यवस्थेनुसार केलेल्या या पाहणीत कोणत्याही जाती-धर्मातील श्रीमंत, उच्च मध्यमवर्ग, मध्यमवर्ग हे भाजपला जास्त मतदान करतात तर संख्येने जास्त असलेला कनिष्ठ मध्यम वर्ग, गरीब वर्ग आणि अति गरीब वर्ग हा काँग्रेसच्या बाजूने उभा राहून तिला विजयी करणार असे सांगितले आहे. मुस्लिम समाजातील संपन्न वर्ग हा भाजपला मतदान करतो असा दावादेखील या पाहणीत केला आहे. निवडणुकीच्या राजकारणात धर्म आणि जात महत्त्वपूर्ण असले तरी जर लोकसभा निवडणुकीत देखील वर्ग व्यवस्थेनुसार मतदान झाले तर 2024 चे निकाल आश्चर्यचकित करतील असे यादव यांचे म्हणणे आहे. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एलपीजी सिलेंडर हा गरीब वर्गासाठी 500 रुपयाला उपलब्ध करून देऊन विधानसभा निवडणुकीच्या 5-6 महिन्यापूर्वी एकच बार उडवून दिला आहे. भाजप ज्या उज्वला योजनेची नेहमी भलावण करते त्या योजनेअंतर्गत येणाऱ्या स्त्रियांनादेखील 500 रुपयाला सिलेंडर उपलब्ध करून देऊन केंद्रातील राज्यकर्त्यांपुढे एक आव्हानच उभे केलेले आहे.
कर्नाटकातील लढाईत भाजपच्या तीन शिलेदारांची कसोटी
कर्नाटक निवडणुकीतील धुमश्चक्रीत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ‘नंबर दोन’ असणाऱ्या तीन शिलेदारांची कसोटी लागल्याने तिला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे सर्वात ज्येष्ठ सरचिटणीस बी एल संतोष आणि संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे सरकार आणि संघटनेतील वजन ते बेंगळुरूमध्ये काय पराक्रम गाजवतात त्यावर अवलंबून राहणार आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. संतोष आणि होसबाळे हे कर्नाटकाचेच असल्याने तेथील बऱ्यावाईट गोष्टींचा त्यांना फटका बसू शकतो. ये•ाrयुराप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडायला लावण्यात संतोष यांचा मोठाच हात होता. हे दोन्ही नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे समजले जातात. मोदी यांचे खासमखास असल्याने देशभरातील संघटनात्मक बाबीत संतोष यांचे मत महत्त्वाचे मानले जाते. पक्षाचे मुख्यमंत्री कसे काम करतात यावर संतोष यांची खास नजर असल्याने त्यांच्या शब्दाला पक्षात वजन आहे. होसबाळे हे दोन वर्षांपूर्वी भैय्याजी जोशी यांच्याजागी सरकार्यवाह बनले. त्याअगोदरपासून ते मोदींच्या जवळचे मानले जातात. काँग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकातीलच आहेत आणि त्यामुळेच बंगळुरूमध्ये ती हारली तर पक्षाला मोठाच अपशकून होणार आहे. शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्नाटकमधील प्रचाराच्या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाचे दार खटखटवले आहे. तसेच ‘जर काँग्रेस कर्नाटकात जिंकली तर दंगली होतील’, या शहा यांच्या दाव्यावर काँग्रेसने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे याचा अर्थ राज्यात त्याला हिंदुत्वाचा ज्वर रोखायचा आहे.
सत्ताधारी पक्षात कोणी फारसे बोलत नसले तरी सर्वांच्याच नजरा 13 मे ला लागणाऱ्या निकालाकडे आहेत. बंगळुरूमध्ये पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही अथवा अपयश हाती आले तर सत्ताधारी पक्षाला पुढील मार्गक्रमण जड जाऊ शकते. नवी दिल्लीचा मार्ग हा बंगळुरूवरून जाणार असा होरा लावला जात आहे तो सध्या तरी फारसा चुकीचा वाटत नाही.
सुनील गाताडे








