भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेले भ्रष्टाचाविरोधी अभियान कसे दिशाभूल करणारे आहे, याचा पर्दाफाश केला जाईल, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. यासाठी पक्षाने ‘वॉशिंग मशिन का काला जादू’ नामक मोहीम हाती घेतली आहे. ही घोषणा मंगळवारी दिल्लीत करण्यात आली. या पक्षाचे दिल्ली प्रभारी गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज यांनी या मोहीमेचा प्रारंभ दिल्लीत केला.
भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचार विरोधी अभियानाचे सत्य सर्वांसमोर मांडण्यात येईल. जो नेता भारतीय जनता पक्षात येईल त्याला शुद्ध करुन घेतले जाते आणि जे नेते या पक्षात जाणार नाहीत, त्यांना कारागृहात डांबले जाते, अशी या पक्षाची नीती आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. यासाठी या पक्षाने अशोक चव्हाण, हिमांत बिस्व सर्मा, अजित पवार, मनीष सिसोदिया, सत्येंदर जैन, संजय सिंग, हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांनी नावेही दिली आहेत.
नेत्यांविरोधात आरोप
भारतीय जनता पक्षाने हिमांत बिस्व सर्मा यांच्या विरोधात सहा महिने अभियान चालविले होते. त्यांचा सारदा घोटाळ्यात हात आहे, असा या पक्षाचा आरोप होता. तथापि, सर्मा भारतीय जनता पक्षात गेले. त्यानंतर त्यांच्या विरोधात आरोप होईनासे झाले. त्यांना आसामचे मुख्यमंत्रीपदही देण्यात आले, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. ही मोहीम मे अखेर पर्यंत चालणार आहे.









