प्रतिनिधी / विटा :
एनडीए बोलावत नाही, तर इंडिया आम्हाला विचारत नाही. त्यामुळे आम्हाला आमची ताकद वाढवावी लागेल. त्यासाठी महाराष्ट्रात फिरतो आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी दीड-दोन टक्क्यांची गरज होती, तेव्हा आमच्याशी युती केली. मात्र सत्ता आल्यानंतर त्यांचा अहंकार जागा झाला. कॉंग्रेसनेही त्या काळात छोटे पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले लोक सत्तेचे लाभार्थी आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.
राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज्य यात्रा शनिवारी विटा शहरात दाखल झाली. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक शिवाजी हारुगडे, रासपचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील, बाळासाहेब मेटकरी, साई नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रणव हारुगडे, महेश मेटकरी, बबन हारुगडे यांच्यासह रासपचे जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यावर कॅगने ताशेरे ओढले आहेत त्यावर माजी मंत्री जानकर म्हणाले, गडकरी यांनी देशभरात केलेली रस्त्याची कामे उल्लेखनीय आहेत. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर चांगली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला अशा गोष्टींमुळे तडा जाऊ शकत नाही. मात्र भाजप आता गोपीनाथ मुंडेंचा पक्ष राहिला नाही. सध्याचा भाजप देवेंद्र फडणवीसांचा आहे. आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपशी युती केली होती. मात्र सध्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून युती करावी, असे नेतृत्व काँग्रेस आणि भाजप अशा दोघांकडेही नाही. त्यामुळे आम्ही आमची ताकद वाढवण्यासाठी फिरतो आहोत.
भारतीय जनता पार्टी हा आयडियालॉजीवर चालणारा पक्ष आहे. त्या पक्षातील वरिष्ठांनी सत्तेसाठी तडजोडी केल्या तरी आरएसएस आणि भाजपचा कार्यकर्ता आपल्या धोरणाला चिकटून राहतो. त्यामुळे भाजप वाढत आहे, तर इतर पक्ष कमकुवत होत आहेत, असेही जानकर म्हणाले.








