बेळगाव : राज्य सरकारने सिव्हिल हॉस्पिटलमधील जेनेरिक मेडिकल बंद करावीत किंवा अन्यत्र स्थलांतरित करावे, असा आदेश जारी केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी बेळगाव जिल्हा भाजपतर्फे सिव्हिल हॉस्पिटलसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील जेनेरिक मेडिकलमध्ये कमी दरात औषधे मिळतात. मात्र, सिव्हिलमध्ये औषधे देण्यात येत असताना जेनेरिक मेडिकलची काही गरज नाही, असे सांगत आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी अलीकडेच राज्यातील सर्व सिव्हिल हॉस्पिटलमधील जेनेरिक मेडिकल बंद करावीत किंवा अन्यत्र स्थलांतरित करावीत, असे जाहीर केले आहे.
जेनेरिक मेडिकलमुळे सर्वसामान्य जनतेला कमी दरात औषधे मिळतात. मात्र, सरकारचा हा निर्णय अन्यायकारक आहे. खासगी मेडिकलमध्ये औषध घेणे परवडत नाही. त्यामुळे सरकारने सिव्हिल हॉस्पिटलमधील जेनेरिक मेडिकल बंद करू नये. बंद केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागासमोर दंडाला काळ्या फिती बांधून भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्ष सुभाष पाटील, भाजप महिला नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, माजी आमदार पी. राजीव, माजी आमदार विश्वनाथ पाटील, डॉ. रवी पाटील, भाजप नेत्या शिल्पा केकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









