खासदार जगदीश शेट्टर यांची पत्रकार परिषदेत माहिती : दूध, वीज, शैक्षणिक शुल्क वाढविल्याबद्दल आक्रोश
बेळगाव : राज्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यातच आता प्रत्येक वस्तू व सेवांचे दर वाढविले जात आहेत. विजेपाठोपाठ पेट्रोल, डिझेल, दूध, मुद्रांक, मद्य, महाविद्यालयीन शुल्क वाढविले जात असून याविरोधात भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे. फ्रिडम पार्कपासून आंदोलनाला सुरुवात होणार असून संपूर्ण राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.
बेंगळूर येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, प्रदेशाध्यक्ष विजेंयद्र यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होईल. बेळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाणार आहे. अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु असून याचा परिणाम राज्यातील इतर नागरिकांवर होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, आमदार विठ्ठल हलगेकर, महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार, महांतेश दोड्डगौडर, अरविंद पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
यत्नाळांना पक्षात आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा
विद्यमान आमदार व माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना भाजपमधील बडतर्फ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळांविषयी प्रश्न विचारला असता ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, पक्षस्थित भंग केल्याबद्दल यत्नाळांवर कारवाई झाली आहे. परंतु यत्नाळांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करू, यत्नाळ नवीन पक्ष काढतील, ही केवळ अफवा आहे. त्यामुळे माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये, असे त्यांनी सांगितले.
भाजप नेत्यांनी केंद्राविरोधात आंदोलन उभारावे : मंत्री हेब्बाळकर
दैनंदिन वस्तुंच्या दरात वाढ करून केंद्र सरकारने जनतेला डोईजड करून ठेवले आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन उभारावे, अशी बोचरी टीका महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. मंगळवारी माध्यम प्रतिनिधीशी त्या बोलत होत्या. इंधन दरवाढ, धान्यांची दरवाढ यामुळे जनता भरडून गेली आहे. कर्नाटकात सरकारने दूध दरात वाढ करून शेतकऱ्यांना फायदा करून दिला आहे. असा पलटवार त्यांनी केला. मागील भाजप सरकारने कंत्राटदारांना संकटाच्या खाईत सोडले आहे. मनमानीपणे निविदा मागवून त्यासाठी रक्कमही मंजूर केली नाही. आता काँग्रेसकडे बोट दाखवित आहेत. कंत्राटदारांवर संकट ओढवण्यास मागील भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आरोप मंत्री हेब्बाळकर यांनी केला. गृहलक्ष्मी योजनेची जानेवारीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. आता फेब्रुवारी महिन्याची रक्कमही मंजूर करण्यात आली असून तीही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.









