सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला अधिकचा 5 कोटीचा विकास निधी देणार : नेसरीच्या भव्य मेळाव्यात महाडिकांची घोषणा
माजी पालकमंत्र्यांना सर्व सत्ता आपल्या घरातच हव्या आहेत. प्रत्येकवेळी एकाची मदत घेऊन सता मिळवतात पण सतेवर आल्यावर ते सोयीस्कर मदत विसरतात. त्यांच्या या कृतघ्नवृतीला जिल्हा कंटाळला आहे, असा घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी केला. तसेच सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला नियमीत विकास निधीपेक्षा जादाचा 5 कोटीचा विकास निधी देणार असल्याची घोषणा महाडिक यांनी केली.
नेसरी (चंदगड) येथे खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री भरमूआण्णा पाटील होते. यावेळी चंदगड आजरा तालुक्यातील कार्यकार्यानी मोठी गर्दी केली होती.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, कोणाच्या लहरीवर कोण प्रतिगामी व पुरोगामी होत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत स्वत: रिंगणात उतरण्याचा धाडस नसल्यामुळे महाराजांचा मुखवटा पुढे केला आहे. आपणाला लहर आली म्हणून खासदार बदलण्याची भाषा करणाऱ्या बंटी पाटलांचे मनसूबे जनता ओळखून आहे. आमच्यावर उपकार केल्याची भाषा करणाऱ्या बंटींच्या उपकाराची परतफेड ज्या-त्या वेळीच केली आहे. चंदगड तालुक्यात विकास निधी देताना काहींवर अन्याय झाला असेल तर ती चूक येत्या पाच वर्षात सुधारली जाईल, असे आश्वासित करून चंदगडच्या हरीतक्रांतीसाठी तिटवडे धरणाच्या उभारणीसाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. कर्नाटक सरकारच्या सहकार्याने लवकरच हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे खासदार मंडलिक यांनी सांगितले.
सभेत चंदगड विभागाचे भाजपप्रमूख शिवाजीराव पाटील, भाजप अभियंता जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अनिता चौगले, गडहिंग्लज साखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, एल. टी. नवलाज, संग्रामसिह कुपेकर, गोकूळचे माजी संचालक बाबा देसाई, माजी मंत्री भरमूआणा पाटील आदींसह अन्य वक्त्यांनी खासदार मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करणारी भाषणे झाली.
स्वागत चंदगड भाजप तालुकाध्यक्ष संतोष तेली यांनी तर प्रास्ताविक भाजप जिल्हा उपाध्यक्ष हेमंत कोलेकर यांनी केले. मेळाव्यास शांताराम बापू पाटील, सुनीताताई रेडेकर, नामदेवराव पाटील, महादेवराव नाईक, भैयासाहेब कुपेकर, बाळ कुपेकर, अॅड. हेमंत कोळेकर, बाळ केसरकर, महादेव साखरे आदींसह भाजपचे चंदगड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते. आभार शांताराम पाटील यांनी मानले.
दोन्ही खासदारांच्या नावात जय
या निवडणुकीत खासदार संजय मंडलिक व धनंजय महाडिक एक दिलाने एकत्र आले आहेत. या दोघांच्या नावात जय आहे. त्यामुळे विजय पक्का आहे. मागील मताधिक्यापेक्षा जास्तीच्या मताधिक्याचा विजय ठरणार असल्याचा ठाम विश्वास संग्रामसिंह कुपेकर यांनी बोलून दाखवला.