जोरदार घोषणाबाजीसह मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दाखवले काळे झेंडे
बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या भाषण करत असतानाच भाजप महिला कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातल्याची घटना सोमवारी बेळगावच्या सीपीएड मैदानावर घडली. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत भाजप कार्यकर्त्यांनी ‘सिद्धरामय्यांना पाकिस्तानात पाठवून द्या’ अशा घोषणा दिल्या. यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट पोलिसावर हात उगारून जाब विचारला. केंद्र सरकारच्या दरवाढीविरोधात तसेच संविधान बचाव आंदोलनासाठी सोमवारी काँग्रेसचा कार्यक्रम सुरू होता. बेळगावच्या सीपीएड मैदानावर आयोजित कार्यक्रमाला काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांच्यासह कर्नाटक मंत्रिमंडळातील अधिकतर मंत्री व आमदार उपस्थित होते. सर्वांची भाषणे झाल्यानंतर शेवटी मुख्यमंत्री सिद्धरामय्या भाषण करण्यासाठी उभे राहिले. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी सभागृहात उभे राहून काळे झेंडे दाखवत घोषणा दिल्या.
भाजप कार्यकर्त्या पोलिसांच्या नजरेतून सुटल्या कशा?
आंदोलनकर्त्या महिला या भाजपच्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे बेळगावमधील पोलिसांना त्यांची जवळून ओळख आहे. असे असतानाही काँग्रेसच्या कार्यक्रमात मुख्य सभामंडपाच्या मध्यभागापर्यंत भाजप कार्यकर्त्या पोहोचल्याच कशा? कोणत्याही पोलिसाने त्या कार्यकर्त्यांना ओळखले नाही का? हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे, अशी नाराजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
घोषणाबाजी आणि पोलिसांची धावपळ
काँग्रेसचा इतका मोठा कार्यक्रम असतानाही प्रवेशद्वाराच्या परिसरात मोजक्याच महिला पोलीस उपस्थित होत्या. त्यांनी महिला कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाल्याचे दिसताच पोलिसांनी एका वाहनातून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना दूर नेले. यावेळी ते वाहन अडविण्याचाही प्रयत्न झाला. या दरम्यान, संतापलेल्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपला रोष पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यावर काढला.









