छत्तीसगडमधील सर्व 10 जागांवर काँग्रेसचा धुव्वा
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगड राज्यात झालेल्या महापौर निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठो विजय झाला आहे. राज्यातील सर्व 10 महानगरपालिकांची महापौर पदे या पक्षाला मिळाली आहेत. या निवडणुका थेट लोकांमधून करण्यात आल्या आहेत. हे यश राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या कामगिरीचे आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी व्यक्त केली आहे. हा ऐतिहासिक विजय राज्य सरकारवर असणाऱ्या जनतेच्या विश्वासाचे द्योतक असून आम्ही नेहमीच उत्तम कामगिरी करत राहू, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राज्यातील 10 महानगरपालिकांसह 173 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यांची मतगणना शनिवारी झाली. राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने बव्हंशी नागरी संस्थांमध्ये बहुमत मिळविले आहे. तर सर्वच्या सर्व 10 महानगरपालिकांमध्येही या पक्षाला बहुमत मिळाल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकांमध्ये 72.19 टक्के मतदान झाले होते. मतदारांची एकंदर संख्या 44 लाख 90 हजार 360 होती. डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेतली होती. विष्णूदेव साय हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत.









