वृत्तसंस्था / गांधीनगर
गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकवार प्रचंड विजय मिळविला आहे. नगरपालिकांच्या 1,912 प्रभागांपैकी या पक्षाने 1 हजार 402 जिंकले आहेत. काँग्रेसला 260 प्रभागांमध्ये यश मिळाले असून आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्ष यांना मिळून 236 प्रभागांमध्ये विजय मिळाला आहे. एकंदर 68 नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने 57 नगरपालिकांमध्ये मोठे बहुमत मिळविले असून काँग्रेसला केवळ 1 नगरपालिका जिंकता आली आहे. समाजवादी पक्ष 2 आणि अन्य 3 नगरपालिकांमध्ये बहुमतात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
नगरपालिकांसमवेत भारतीय जनता पक्षाने तालुका पंचायतींच्या निवडणुकीतही अशीच घसघशीत कामगिरी केली असून अन्य पक्षांना बरेच मागे टाकले आहेत. महानगर पालिकांच्या काही प्रभागांमध्येही निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या पोटनिवडणुकांमध्येही बहुतेक स्थानी भारतीय जनता पक्षच विजयी झाला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या विजयासाठी मतदारांचे आभार मानले असून पक्षकार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वत:ची अगदी तळागाळापासून भक्कम बांधणी केली असल्याने या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही यश मिळते. ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये भारतीय जनता पक्षाची कामगिरी उत्तम आहे. लोकांशी संपर्क आणि लोकांच्या समस्या सोडविण्याकडे या स्थानिक संस्था गांभीर्याने लक्ष देतात. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सर्वसामान्य मतदारांशी सातत्याने संपर्क असल्याने आम्ही जनतेचा विश्वास टिकविला. 1995 पासून सातत्याने भारतीय जनता पक्ष स्थानिक निवडणुका जिंकत आहे. इतके सातत्यपूर्ण यश गुजरातमध्ये काँग्रेसलाही मिळविता आलेले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली असून महानगरपालिकांच्या निवडणुकाही जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.









