2024 च्या लोकसभा निवणुकीसंदर्भात शहा यांचा विश्वास
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा निर्विवाद बहुमत मिळवणार असून पक्षाला स्वबळावर 300 हून अधिक जागा मिळतील, असा आत्मविश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे व्यक्त केला आहे. आसाममध्ये भाजप 12 ते 14 जागा जिंकणार आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.
त्यांच्या हस्ते मंगळवारी आसामधील भाजपच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱया कार्यकर्त्यांना संबोधित केले. भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी काँगेसवरही जोरदार टीका केली. एकेकाळी ईशान्य भारत हा काँगेसचा बालेकिल्ला होता. तथापि, आज या पक्षाचा या भागातून सफाया झाला आहे. या भागाच्या प्रगतीकडे काँगेसने अक्षम्य दुर्लक्ष केले. या पक्षाने आपल्या 60 वर्षांच्या सत्ताकाळात या भागात जितका विकास केला त्यापेक्षा कितीतरी जास्त विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये केला. त्यामुळे येथील लोकांच्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
तीन राज्यांमध्ये विजय
काही आठवडय़ांपूर्वीच भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांनी त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविला आहे. येथे मतदारांनी काँगेसचा धुव्वा उडविला आहे. कारण भाजपने केलेल्या विकासकामांमुळे येथील जनता समाधानी आहे. आफ्स्पा हा कायदा आता 70 टक्के ईशान्य भारतातून हटविण्यात आला आहे. आसामच्या बोडोलँड आणि कार्बी अँगलाँग या भागांमध्ये शांतता निर्माण करण्यात आली आहे. आठ आदीवासी फुटीरवादी गटांनी शरणागती पत्करली आह. या भागातील विविध राज्यांमध्ये गेली अनेक दशके सुरु असणारा सीमावाद मिटविला जात आहे. या भागात मोठय़ा प्रमाणावर पायाभूत सुविधा, वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य केंद्रे आणि उद्योग स्थापन केले जात आहेत. त्यामुळे या भागातील लोकांच्या अनेक दशकांच्या मागण्या भाजपनेच पूर्ण केल्या आहेत, असेही प्रतिपादन त्यांनी केले.









