प्रतिनिधी,इचलकरंजी
कोल्हापूर जिह्यातील लोकसभेच्या दोनही जागा भाजपाच जिंकणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. इचलकरंजी येथे नुकतेच सुशोभीकरण केलेल्या भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर. जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात गतवेळी 33 महिन्यांचे जुलमी सरकार असूनही भाजपाचा एकही आमदार पक्षातून फुटला नाही. कधीतरी सुर्य उगवेल या अपेक्षेत असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींना नव्या सरकारच्या रूपाने भेट मिळाली आहे. आगामी लोकसभेसाठी भाजपाला 400 जागा क्रॉस करायच्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर येथील दोनही लोकसभेच्या जागा भाजपाच जिंकणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी कामास लागावे. केंद्रासह महाराष्ट्रातही भाजपाचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर हा भाजपाचा असेल तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाचे कमळच फुलेल.
यावेळी भाजपाचे नूतन शहराध्यक्ष अमृत भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, वैशाली नायकवडी, सरचिटणीसपदी शहाजी भोसले यांना निवडीचे पत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिले. यावेळी मावळते अध्यक्ष अनिल डाळया, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, राहुल चिकोडे, हिंदूराव शेळके, अशोक स्वामी, सुनिल महाजन, किसन शिंदे, अजितमामा जाधव, पूनम जाधव, धोंडिराम जावळे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इंडिया आघाडीच्या ट्रेनला ड्रायव्हरच नाही
विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीवरही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सडकून टिका केली. इंडिया आघाडीच्या ट्रेनमध्ये काही पक्षाचे नेते व पदाधिकारी सध्या बसले आहेत. पण या ट्रेनला ड्रायव्हरही नाही व गार्डही नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. याउलट भाजपा आघाडीच्या ट्रेनचा ड्रायव्हरही आहे व गार्डही आहे. त्यामुळे आमची ट्रेन ही सुसाट असल्याचे मंत्री पाटील म्हणाले.
टायगर कभी सोयाही नही था
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या कार्याचा आढावा घेत निवडणुकीच्या पराभवानंतरही हाळवणकर सक्रीय असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांमधुन टायगर जिंदा है अशी घोषणाबाजी झाली. हाच धागा पकडत मंत्री पाटील यांनी टायगर सोयाही कब था असे म्हणत हाळवणकर यांच्या कामाला दाद दिली.








