पंतप्रधानांच्या उपस्थितीत देशातील पहिल्या सेमी-हाय-स्पीड ट्रेन कॉरिडॉरच्या फेज 3 चे उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने निवडणुकीसाठी जोरदार सुरुवात केली आहे. आता भाजपही निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहे. 29 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत. पुढील आठवड्यात दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या दोन प्रचारसभा प्रस्तावित आहेत. पहिली रॅली 29 डिसेंबरला तर दुसरी रॅली 3 जानेवारीला सुरू होईल.
रविवार, 29 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी रिठाळा येथे नवीन मेट्रो लाईनची पायाभरणी करतील. ते सेमी-हाय-स्पीड ट्रेन कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटनही करतील. या प्रकल्पाला दिल्ली-मेरठ रॅपिड रेल्वे असेही म्हणतात. पंतप्रधान मोदी येथून थेट रोहिणीला जाणार आहेत. रोहिणीच्या जपानी पार्कमध्ये पंतप्रधान मोदी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. याशिवाय 3 जानेवारीला पंतप्रधान मोदी ईशान्य दिल्लीतील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यामध्ये दिल्ली ते सहारनपूर या नवीन महामार्गाचा समावेश आहे. या प्रचारसभांमध्ये दिल्लीतील महिलांसाठी पंतप्रधान मोदी काही महत्त्वाच्या घोषणा करू शकतात.









