गडकरी, सिंधिया यांच्यासह 20 जणांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्ष (भाजप) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि गिरीराज सिंह यांच्यासह 20 खासदारांना नोटीस पाठवणार आहे. मंगळवारी ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक मांडताना हे खासदार लोकसभेत उपस्थित नव्हते. या विधेयकावरील चर्चेवेळी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजपने 3 ओळींचा व्हिप जारी केला होता. सदर व्हिपमध्ये विधेयकाच्या सादरीकरणावेळी पक्षाच्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. हे निर्देश न पाळल्यामुळे खासदारांना नोटीस पाठवून कारण विचारण्यात येणार आहे. अनुपस्थित असलेल्या खासदारांनी आपल्या गैरहजेरीबाबत पक्षाला अगोदरच कळवले होते की नाही, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सी. आर. पाटील, शंतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बी. वाय. राघवेंद्र, विजय बघेल, उदयनराजे भोसले, जगन्नाथ सरकार, जयंत कुमार रॉय, व्ही सोमण्णा, चिंतामणी महाराज यांच्यासह एकूण 20 खासदार विधेयकावरील चर्चा व मतदानावेळी सभागृहामध्ये उपस्थित नसल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.









