‘इंडिया’ नावाला लक्ष्य करणे टाळणार सत्तारुढ पक्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया हे नवे नाव मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी सत्तारुढ भाजपच्या नेत्यांनी या नावावर निशाणा साधला होता. परंतु आता भाजपचे नेते विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ या नावाने संबोधिणार नाहीत. विरोधी पक्षांच्या आघाडीचा संपुआ या जुन्या नावानेच उल्लेख करण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे समजते.
विरोधी पक्षांनी जाणूनबुजून इंडिया नावा ठेवत स्वत:च्या जुन्या घोटाळ्यांचा जनतेला विसर पडावा असा प्रयत्न केला आहे. परंतु भाजप जनतेला काँग्रेसवर झालेल्या आरोपांबद्दल वारंवार सांगत राहणार आहे. याचमुळे विरोधी पक्षांच्या आघाडीला संपुआ या नावानेच भाजपकडून संबोधिले जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी मणिपूर मुद्द्यावरून टीका करताना वारंवार संपुआ या शब्दाचाच वापर केला.
18 जुलै रोजी बेंगळूर येथे झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी स्वत:च्या आघाडीला इंडिया हे नवे नाव दिले होते. विरोधी पक्ष सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत जागावाटपावरून चर्चा होणार आहे. या बैठकीच्या तयारीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.









