तारीख जवळपास निश्चित : अनेक नेत्यांची नावे चर्चेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप स्वत:च्या नव्या अध्यक्षाची नियुक्ती दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर करणार आहे. पक्षाच्या अध्यक्षाची निवडणूक 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीदरम्यान होण्याची शक्यता आहे. वर्तमान अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा हे दिल्ली विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपचे नेतृत्व करणार आहेत. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी 2024 मध्येच समाप्त झाला होता, परंतु लोकसभा निवडणूक विचारात घेत त्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढविण्यात आला होता.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय परिषद आणि राज्य परिषदेचे सदस्य सध्या निवडले जात आहेत. राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीपूर्वी राज्यांच्या शाखांपैकी किमान 50 टक्के शाखांना स्वत:ची संघटनात्मक निवडणूक पूर्ण करावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ 4 राज्यांनी प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. भाजप नेत्यांनुसार संघटनात्मक निवडणूक स्वत:च्या निर्धारित वेळेत होत असून वेळेत पूर्ण होणार आहे.
भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मंजुरीनेच होईल. या शर्यतीत अनेक नावे चर्चेत आहेत. परंतु भाजपकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपच्या नव्या अध्यक्षाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान आणि पक्ष महासचिव विनोद तावडे यांच्या नावांची चर्चा होत आहे. याचबरोबर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नावही राजकीय वर्तुळात घेतले जात आहे. सूत्रांनुसार विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान किंवा भूपेंद्र यादव यांच्यापैकी एकाला अध्यक्षपद मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.
धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांचे नाव मागील संघटनात्मक निवडणुकीतही चर्चेत होते. परंतु अखेरीस न•ा यांना ही भूमिका सोपविण्यात आली होती. हे तिन्ही नेते पक्षामध्ये स्वत:च्या कार्यांद्वारे अनुभव मिळवून आहेत. भूपेंद्र यादव हे राजस्थानातील तर धर्मेंद्र प्रधान हे ओडिशाशी संबंधित आहेत. विनोद तावडे हे महाराष्ट्राशी संबंधित आहेत. तिन्ही नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते.
पक्षाच्या घटनेनुसार किमान 15 वर्षे पक्षाचा सदस्य असलेल्या व्यक्तीलाच राष्ट्रीय अध्यक्ष करता येते. यापूर्वी 2010-13 पर्यंत पक्ष संघटनेची धुरा नितीन गडकरी यांच्याकडे होती. तर राजनाथ सिंह 2005-09 आणि 2013-14 पर्यंत भाजपचे अध्यक्ष राहिले. 2014-2020 पर्यंत अमित शाह यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.









