गोवा प्रदेश प्रभारी सी. टी. रवी यांचा विश्वास ; सध्या देशात लोकशाहीविरुद्ध घराणेशाहीत संघर्ष
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने गेल्या 9 वर्षांत देशाचा कायापालट केला आहे. जनतेला याची माहिती आहे. यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 350 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा भाजपाचे प्रभारी सी. टी. रवी यांनी व्यक्त केला आहे. भाजपाच्या येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते. सी. टी. रवी पुढे म्हणाले, 2012 पूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला ‘धोरण लकवा’ मारला होता. यामुळे 2004 ते 2014 या दहा वर्षांत देश पिछाडीवर गेला. पण 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाने प्रत्येक क्षेत्राचा विकास केला आहे. भाजपाने गेल्या नऊ वर्षांत केलेल्या सर्वांगीण विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने देशभर महासंपर्क उपक्रमाचे आयोजन केले आहे. आज दि. 13 रोजीपासून गोव्यात जनसंपर्क मोहीम हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस म्हणजे ‘स्कॅम’, भाजप म्हणजे ‘स्कीम’
भाजपा आणि काँग्रेस यांच्यात तुलना करायची झाल्यास काँग्रेस म्हणजे ‘स्कॅम’ आणि भाजपा म्हणजे ‘स्कीम’ असे करता येईल, अशी खिल्ली सी. टी. रवी यांनी उडवली. भाजपा हा अंत्योदय तत्त्वावर काम करणारा आणि राष्ट्र प्रथम या भावनेने काम करणारा पक्ष आहे. यामुळेच भाजपाने समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या आणि त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणीही केली. तसेच परराष्ट्र नीती ठरवताना केवळ आणि केवळ भारताचा विचार केला. त्यामुळे आज जगभरात भारत देश ताठ मानेने, कणखरपणे उभा आहे, असेही सी. टी. रवी म्हणाले.
देशात लोकशाहीविरुद्ध परिवारवादात संघर्ष
आज आपल्या देशात लोकशाही आणि परिवारवाद यांच्यात संघर्ष सुरू आहे. भाजपमध्ये लोकशाहीला सर्वोच्च स्थान आहे, तर विरोधी पक्षांत केवळ त्यांच्या परिवारातील लोक आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा प्रामाणिकपणा आणि विरोधकांचा भ्रष्टाचार आज आमनेसामने आले आहेत. विरोधक स्वार्थासाठी एकत्र येण्याची भाषा करत आहेत. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी 2024 च्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त करून सी. टी. रवी यांनी देशाला विश्वगुऊ करण्याचे भाजपाचे स्वप्न असल्याचे सांगितले.
कर्नाटकात चुका झाल्याने भाजपचा पराभव
कर्नाटकात अनेक चुका झाल्या म्हणून तेथे भाजपचा पराभव झाला, अशी कबुली रवी यांनी दिली. त्याची जबाबदारी आपण स्वीकारतो. भाजपने कर्नाटकात मोदींप्रमाणे कामे केली नाहीत. त्याचा फटका बसल्याने भाजपला पराभव सोसावा लागला. त्याची कारणे शोधून काढली जातील, असे रवी यांनी नमूद केले.
गोवा मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर बोलण्यास नकार
गोवा मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर बोलण्यास त्यांनी नकार दर्शविला. तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात असून त्यावर आपण बोलणे योग्य नाही. तो आपला अधिकारही नाही. प्रश्न बरोबर आहे पण तो चुकीच्या माणसाला विचारला असे सांगून रवी यांनी हा प्रश्न सीएमना विचारा असे सूचित केले. म्हादई जलतंटा लवादाने जो निवाडा दिला आहे, त्याचे पालन तिन्ही राज्यांनी करावे, असे ते म्हणाले.









