मुस्लिम बोर्डिंग येथे साधला संवाद; दुसऱ्याचे पक्ष फोडण्याकडे शिंदे- फडणवीस सरकारचे लक्ष
कोल्हापूर प्रतिनिधी
आगामी निवडणुकांच्या तोंडावर मतांसाठी भाजपा दंगली घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मुस्लिम समाजातील तऊणांनी डोके शांत ठेवावे, असे आवाहन शिवसेना (उध्दव ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी बुधवारी येथे केले. तसेच सर्वसामान्यांच्या दुखण्यांकडे लक्ष देण्याऐवजी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे लक्ष आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगला भेट देऊन त्यांनी मुस्लिम समाजातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, संचालक अल्ताफ झांजी, रफिक शेख, रफिक मुल्ला, याकत मुजावर, डॉ. नमाजी, बाळासाहेब मोमीन, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) सह संपर्कप्रमुख हाजी अस्लम सय्यद उपस्थित होते.
गणी आजरेकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू ग्रंथ, शाल व श्रीफळ देऊन भास्कर जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
भास्कर जाधव म्हणाले, भाजपकडून देशात जातीयवाद पसरविला जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी दंगली घडविण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने विशेषत: तऊणांनी डोके शांत ठेवावे. भाजपाविरोधात देशात 28 राजकीय पक्ष एकत्र येऊन आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपाविरोधात आता सर्व समाजघटकांनी हातात हात घालून एकसंध राहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीच्या तख्तावऊन खाली खेचूया. तसेच महाराष्ट्रानेही आता जागे होण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, मुस्लिम समाजाने कधीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत. त्यांचा नेहमी आदरच केला आहे. छत्रपती शिवरायांचे वकिल काझी हैदर हे मुस्लिम होते. तसेच त्यांच्या सैन्यातही मोठ्या पदावर मुस्लिम होते. हा इतिहास आहे.
राजर्षी शाहूंच्या बदनामीचे षडयंत्र कोणी रचले ?
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सर्वाधिक छळ कोणी केला ? त्यांना शूद्र कोणी म्हंटले ? त्यांच्या बदनामीचे षडयंत्र कोणी रचले ? हा इतिहास पाहण्याची गरज आहे, असे जाधव यांनी सांगितले.
मराठा, मुस्लिम, धनगर समाजाची सरकारकडून फसवणूक
मराठा आरक्षणप्रश्नी सध्याचे सरकार समाजाला फसवत आहे. तशीच स्थिती मुस्लिम आरक्षण व धनगर आरक्षणाची झाली आहे. मराठा समाजासह या दोन्ही समाजाची फसवणूक करत त्यांना झुलवत ठेवण्याचे काम सरकारकडून सुऊ आहे, असा टोला जाधव यांनी लगावला. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासह मुस्लिम व धनगर आरक्षणासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या निर्णयांना फडणवीसांकडून स्थगिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोणत्याही निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती देण्याऐवजी ते काम दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा टोला जाधव यांनी लगावला. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्या कोणत्याही निर्णयाला ठाकरे यांनी स्थगिती दिली नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.