मध्यप्रदेश, झारखंडचा समावेश : पंजाबचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांचा राजीनामा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. मध्यप्रदेश, झारखंड, पंजाब, तेलंगणा आणि केरळ या पाच राज्यांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा करू शकतात, असे सूत्रांकडून समजते. फेरबदलांची चर्चा सुरू असतानाच पंजाबमधील प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी सोमवारी राजीनामा दिला. आता शर्मा यांच्या जागी सुनील जाखड यांच्याकडे पंजाब भाजपची कमान सोपवली जाऊ शकते.
चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या चार राज्यातील विधानसभा आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्त्वाने जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे. 6, 7 आणि 8 जुलै रोजी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष प्रादेशिक नेत्यांच्या बैठका घेणार आहेत. भाजप पहिल्यांदाच मोर्चाचे अध्यक्ष आणि तीन झोनच्या (पूर्व, उत्तर आणि दक्षिण) सरचिटणीसांच्या बैठका घेणार आहे.
6 जुलै रोजी गुवाहाटीमध्ये पूर्वेकडील 12 राज्यांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, अऊणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसाममधील नेत्यांचा समावेश असेल. 7 जुलै रोजी दिल्लीत उत्तरेकडील 13 राज्यांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, जम्मू-काश्मीर, लडाख, गुजरात आणि दमण दीव-दादर नगर हवेली येथील नेत्यांना पाचारण करण्यात आले आहे. 8 जुलै रोजी हैदराबादमध्ये दक्षिणेकडील 11 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मुंबई, गोवा, अंदमान आणि निकोबार, पाँडिचेरी आणि लक्षद्वीपचा समावेश आहे.
यावषी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये भाजपचे सरकार आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि तेलंगणात बीआरएसची सत्ता आहे. यावषी 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या असून त्रिपुरामध्ये युती करून पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे. मेघालय, नागालँडमध्येही भाजप सरकारमधील सहयोगी आहेत. कर्नाटकातच पक्षाला सत्ता गमवावी लागली. या निवडणुकांनंतर आता पुढील निवडणुकांची रणनीती सुरू झाली आहे.









