भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी कधीही संपर्क साधला नाही तसेच अशा प्रकारच्या अफवा काही लोकांकडून पसरवल्या जात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. खरेतर, अजित पवारांना महाविकास आघाडीतील (MVA), शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून लक्ष केले जात असल्याचा दावाही भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला.
भाजपच्या बैठकीच्या निमित्ताने पुण्यात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आणि त्यानंतरचा यू- टर्न म्हणजे नाटक असल्याचा दावा करून राजीनाम्याचा संपूर्ण भाग ‘स्क्रिप्टेड’ असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “गेल्या चार महिन्यांपासून मी आणि अजित पवार दोघेही एकमेकांच्या संपर्कात नाही. खरे तर अजित पवारांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जाते. आम्ही अजितदादांशी कधीही कसलाही संपर्क साधला नाही. काही अफवाही पसरवल्या जात आहेत” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “माझा ठाम विश्वास आहे की काही लोकांमध्ये मतभेद असले तरी प्रश्न हा आहे की रयत शिक्षण संस्थेसह अनेक सहकारी संस्थांचे अध्यक्ष बनलेले शरद पवार संस्थांच्या घटनेत फेरफार करून कोणालाही अध्यक्ष कसे होऊ देतील?” असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला.